सिंधुदुर्ग : जय जवान जय किसान, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे. आदी विविध घोषणा देत खावटी, मध्यम व अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा, आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शेतकरी आग्नेल फर्नांडिस, संदीप देसाई, संतोष पेडणेकर, महेश चव्हाण, अर्जुन नाईक आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखापर्यंतचे कर्ज शासनाने माफ केले आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम पाहता २ लाखापेक्षा जास्त कर्ज दिसते अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. हे शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित राहिले आहेत. तसेच शासनाने खावटी कर्जाचा विचार कर्जमाफी साठी केला आहे. मात्र मध्यम व अल्प कर्जाबाबत कोणतेही धोरण नाही.
अनेक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नशासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसेच २०१४ पासून खावटी, मध्यम व अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, २०२२-२३ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी तसेच गेल्यावर्षी कोळी रोगामुळे सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनामे होऊनही त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे याकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आज भात पीक, आंबा व काजू पीक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले.