कणकवली : देशात गेले चार महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सिंधुदुर्गातील जनतेने प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून लॉकडाऊन पाळले आहे. आता शेतीची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत.
लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या घेण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करून गरज आहे त्याच भागात लॉकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, देशात गेले चार महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. आता शेतीची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत.आताच सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती आणि आपण गरज नसताना २ ते ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे शेतकरी शेतीची अवजारे, खते व शेतीसंबंधी कामासाठी शहराच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. यामुळे जनतेमध्ये तसेच जिल्हा व्यापारी संघामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे, असेही या निवेदनात राजन तेली यांनी म्हटले आहे.