दोडामार्ग : आमसभेत सर्वसामान्याचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविणे अपेक्षित असते, पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्गची आमसभा पोलीस फौजफाट्यात आयोजित केली. आपण सांगतो तेच खरे, असे सांगून आमसभेत लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केसरकरांनी पुढची आमसभा थेट पोलीस ठाण्यातच घ्यावी. मग जनतेच्या प्रश्नांचा सवाल येणार नाही. आम्ही तिथे येऊन प्रश्न विचारू, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते आमदार नीतेश राणे यांनी केली.दोडामार्ग येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आमदार राणे दोडामार्ग दौऱ्यावर आले होते. यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, आमसभा ही जनतेसाठी असते, हा मतदार संघ पालकमंत्र्यांचा आहे, याठिकाणी आमसभा होत असताना केसरकर यांनी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. कोणताही प्रश्न विचारल्यावर यासंबंधी मुंबईला बैठक लावतो, मी मंत्री आहे खाली बसा, मला हवे तेच उत्तर देईन, अशी उत्तरे देणे आणि आमसभा घेणे हीच लोकशाही का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. दोडामार्गात अनेक प्रश्न आहेत. आरोग्याचा प्रश्न तर अगदी महत्त्वाचा आहे. दोडामार्ग रुग्णालयाला डॉक्टर मिळत नाही. मात्र, सावंतवाडीत बारापैकी बारा डॉक्टर मिळतात. लोकांनी काय पाप केले म्हणून हे पालकमंत्री पालकांसारखे का वागत नाहीत, असा संतप्त सवालही आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)हत्तीप्रश्नी १६ जूनला पाहणीदोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावातील हत्ती प्रश्न गंभीर असून त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस दोडामार्गचे पदाधिकारी १६ जूनला परिस्थितीची पाहणी करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. ... स्वतंत्र ‘टोलबुथ’गोवा सरकारने सिंधुदुर्गच्या वाहनांना ‘टोल’ तूर्त स्थगित केला आहे. मात्र, भविष्यात हिंमत केल्यास राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने सिंधुदुर्गात ‘स्वतंत्र टोलबुथ’ उभारून गोव्यातील वाहनांना टोल लावण्यात येईल. यातून मिळणारी रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे किंवा समाज कार्यासाठी वापरण्यात येईल, असे राणे यांनी टोलप्रश्नाबाबत बोलताना सांगितले.यापुढे भक्कम पक्षबांधणीआमसभेत काँग्रेसच्यावतीने बऱ्यापैकी आमदारांना जाब विचारण्यात आला. काही अंशी पदाधिकारी कमी पडले. पण यापुढे पक्षबांधणी मजबूत करून वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले जातील, असे नीतेश राणे यांनी सांगितले.
पुढची आमसभा पोलीस ठाण्यात घ्या
By admin | Published: June 12, 2015 10:46 PM