कणकवली: सर्वच महिलांबद्दल एकच भूमिका असली पाहिजे. विरोधकांना मणिपूरबद्दल ऐकायचे असेल तर, दिशा सालियन आणि डॉ. पाटकर यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे ते सुद्धा आम्हाला ऐकायचे आहे असा प्रतिप्रश्न आमदार नितेश राणेंनी केला.
काँग्रेसच्या महिला आमदारांनी विधिमंडळाबाहेर मणिपुरातील घटनेचा जसा निषेध केला आणि न्यायाची मागणी केली, त्याचप्रमाणे राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले गेले आहे. त्याही घटनेचा निषेध करावा. या प्रकरणात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली व सोनिया गांधी, राहुल, प्रियांका यांची भूमिका काय आहे? हे त्यांनी जाहीर करावे असेही ते म्हणाले. तसेच मोदी सरकार आणि भाजप विरोधात विनाकारण नकारात्मकता पसरविण्याचे काम विरोधकांनी बंद करावे असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.कणकवली येथे शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, स्वतःला महिलांचे कैवारी समजतात ते ठाकरे सेनेतील संजय राऊत आणि त्यांच्या मालकाचा मुलगा महिला हक्कावर बोलतो, तेव्हा या लोकांनी ज्या महिलांना त्रास दिला, त्या महिलांना ते पाहून त्रास होत असेल. काँग्रेसच्या महिला आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलत आहेत. पण दिशा सालियान,डॉ. पाटकर यांना न्याय देण्यासाठी विरोधी पक्षाच्या महिला आमदार पुढे येतील काय? राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले. त्याबद्दल तेथील काँग्रसचे मुख्यमंत्री कारवाई करणार काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला.पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर घटने संदर्भात खूप कडक भूमिका घेतली आहे. त्या व्हिडिओत जे राक्षस दिसत आहेत. त्यांची गय केली जाणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, विरोधक राजकारण करून मोदींना टार्गेट करण्यासाठी देशाची बदनामी करत असल्याचेही ते म्हणाले.करेक्ट कार्यक्रम काय असतो? ते संजय राऊत यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राज्यसभेत चर्चा करायचे सोडून भांडुप मध्ये बसून बोलू नये असेही राणे म्हणाले.