कणकवली : यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच मुंबईची तुंबई होणार नाही, यासाठी खबरदारी घ्या, अशी मागणी करणारे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते, अशी प्रसारमाध्यमात मुंबईची ओळख आहे. या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. तरीही सत्ताधारी असलेली शिवसेना काहीही करू शकलेली नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.या पत्रात म्हटले आहे की, मुंबईत ३८६ तुंबणारी धोक्याची ठिकाणे आहेत, आणि यावर्षी २२ दिवस भरतीही आहे. त्यामुळे २५० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल. अशी भीती सर्वत्र आहे, असे नितेश राणे यांनी या पत्रात म्हटले आहे.या परिस्थितीत पाण्याचा उपसा करण्यासाठी कोणत्या योजना केल्या आहेत का ? राज्य सरकार व महानगरपालिका प्रशासन यावर धोरणे आखणार आहे का ? संभाव्य परिस्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल जनजागृती केली आहे का ? असे प्रश्न नितेश राणे यांनी या पत्राद्वारे उपस्थित केले आहेत. तसेच पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.
मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 4:53 PM