मालवण : देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. एलईडी तसेच पर्ससीन मासेमारीलाही कायद्याने बंदी आहे. मात्र, परराज्यातील शेकडो एलईडी नौका शासनाचे नियम धाब्यावर बसवून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अक्षरश: धुडगूस घालत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. मत्स्य विभागाने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी पहाटे गोव्यातील अवैधरित्या एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई केली. दरम्यान, संबंधित नौकेवर एलईडी साहित्य सापडून आले असून मत्स्य विभागाने नौका जप्त केली आहे. नौकेवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.
एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीस बंदी असतानाही येथील समुद्रात सध्या परराज्यातील एलईडी धारकांनी घुसखोरी करीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवूनही मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पारंपरिक मच्छिमारांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. यात मंगळवारी पहाटे मत्स्य व्यवसाय विभागाची गस्त सुरू असताना २५ वाव समुद्रात एक नौका एलईडीच्या सहाय्याने अवैधरित्या मासेमारी करीत असल्याचे आढळून आले.
त्यानुसार गस्तीनौकेवरील मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर, पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर, अमित हरमलकर यांनी ही नौका पकडली. नौकेवरील कागदपत्रांची तपासणी केली असता गोवा येथील ह्यपेस्काडोर ३ह्ण नावाची नौका माधुरी हलरणकर यांच्या मालकीची असल्याचे दिसून आले. ही नौका जप्त करून येथील बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आली आहे. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या मासेमारी करणाºया नौकांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.पोलिसांचे आभार
सध्या कोरोनामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीतही कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिल्याबद्दल परवाना अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांचे आभार मानले. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाने केलेल्या या कारवाईबाबत पशु, दुग्ध, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.