कणकवली : कोणतेही काम फुकट होत नाही. चौपदरीकरणाला टोल आकारण्याला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु टोल आकारणीत पारदर्शकता हवी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केली. येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. टोल घेण्याला आमचा कधीच विरोध नाही. तो ज्यापद्धतीने घेतला जातो त्याला आमचा विरोध आहे. टोल जगभरात सगळीकडे घेतला जातो. परंतु तेथील पद्धत वेगळी आहे. आपल्याकडे तशा पद्धतीने टोल घेतला जात नाही. रोख रकमेच्या स्वरूपात नाक्यावर टोल घेण्यामुळे सरकारला किती आणि कंत्राटदाराला किती पैसे जातात, याबाबत पारदर्शकता राहत नाही. कमी खर्चाच्या प्रकल्पांना टोलची गरज नाही. सिंधुदुर्गात पर्यटन स्थळांना भेटी देत असल्याबद्दल त्यांना छेडले असता राज ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. परंतु छोटी-मोठी हॉटेल्स येऊन फक्त पर्यटन वाढणार नाही. त्यासाठी तीन-चार मोठे पर्यटन प्रकल्प उभारावे लागतील. त्यानंतर पर्यटनाला ऊर्जितावस्था येईल. सिंधुदुर्गातील गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रश्न तसेच आहेत. त्यावर आमच्या विकास आराखड्यात उत्तरे सापडतील. संघटनात्मक पातळीवर मनसेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आम्ही काय करणार आहोत, हे हळूहळू दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. येथील मुख्य चौकात राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर कणकवली व वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ठाकरे यांनी घेतली. (प्रतिनिधी)
टोल घ्या पण पारदर्शकता ठेवा
By admin | Published: June 25, 2015 12:56 AM