संदीप बोडवेमालवण (जि. सिंधुदुर्ग) : भारतातील प्रमुख असलेल्या शासनाच्या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामधील डायव्हिंग पुलाला गळती लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐन पर्यटन हंगामात पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे स्कुबा डायव्हिंग केंद्रच बंद ठेवण्याची नामुश्की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर ओढवली आहे. मुख्य म्हणजे देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारे निवती रॉक्सजवळील डिस्कव्हर स्कुबाही यामुळे बंद राहणार आहे. याचा मालवणच्या सागरी पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे.तारकर्ली (ता. मालवण) येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात ओपन वॉटर, ॲडव्हान्स ओपन वॉटर, इमर्जन्सी फर्स्ट रेस्पाँडर, रेस्क्यू डायव्हर, डाइव्हमास्टर अन्य कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी इसदामध्ये २५ फूट खोलीचा भला मोठा डायव्हिंग पूल बांधण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थ्यांना या पुलात प्रशिक्षण दिले जाते. आता हे प्रशिक्षण थांबले आहे.
डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग बंदएमटीडीसीमार्फत निवती रॉक्सजवळील समुद्रात होणारे डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग जगप्रसिद्ध आहे. पर्यटकांना प्रत्यक्षात स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात उतरविण्यापूर्वी इसदामधील या डायव्हिंग पुलात स्कुबाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठीची तयारी करवून घेतली जाते. दुरुस्तीच्या कामामुळे डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू..दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला आता गळती लागली आहे. यामुळे या पुलाचे आणि इतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे पर्यटक आणि प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा हिरमोड होणार आहे. हा तारकर्लीच्या पर्यटन क्षेत्रासाठी मोठा फटका मानला जात आहे.
लांबलेल्या पावसामुळे हे काम दिवाळीच्या पर्यटन हंगामापूर्वी पूर्णत्वास जाऊ शकले नाही. पर्यटकांची गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर काम पूर्ण करून पर्यटकांसह प्रशिक्षणार्थ्यांना दर्जेदार सोयीसुविधा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. -सूरज भोसले, व्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक, इसदा-एमटीडीसी, तारकर्ली