रत्नागिरी : गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे मच्छिमार खोल समुद्रात बोटी घालण्यास धजावत नसल्यामुळे माशांची आवक घटली आहे. परिणामी बाजारात उपलब्ध माशांच्या दरात मात्र वाढ झालेली दिसून येत आहे.सध्या हवामानात बदल दिसून येत आहे. गार वारा तसेच सकाळी ढगाळ वातावरण, सायंकाळच्या वेळेत पाऊस पडत आहे. त्यामुळे मच्छिमार बोटी खोल समुद्रात घालीत नाहीत. वाऱ्यामुळे माशांची उपलब्धता कमी होत असल्याने बाजारातील माशांची आवकही मंदावली आहे. परिणामी दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या सुरु असलेल्या हवामानाचा फटका मच्छिमारांना बसत आहे. काही मच्छिमारवगळता अन्य साऱ्यांनी आपल्या नौका किनारीच ठेवणे पसंत केले आहे.या मोसमाच्या चार महिन्यातील ही दहा ते बारावी वेळ आहे. डिसेंबर आला तरीही जोरदार वारे आणि पाऊस कोसळत असल्याने मच्छिमार हैराण झाला आहे. दरम्यान, मच्छिमारांनी विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत मच्छिच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन दिवसात बांगडा, सौंदाळे, टायनी कोळंबी, खेकडे आदींची मरतूक कमी झाली आहे. त्यामुळे चढ्या दराने हे मासे विकले जात आहेत. सुरमई, कोळंबी या मच्छिने तर सामान्यांंचा आवाका तोडला आहे. या माशांचे दर जवळपास दीडपट झाल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे. माशांच्या दरातील वाढ लक्षात घेता सर्वसामान्यांना मासे खाणे मुश्कील झाले आहे. म्हाकूळ ६० ते १८० रूपये, सवंदाळे १२० ते १५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खेकडे ७० ते १५० रूपये परडी दराने विकण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)
चविष्ट माशांनी तोंडचे पाणी पळवले...
By admin | Published: December 14, 2014 10:13 PM