-बाळकृष्ण परब एकीकडे कोरोना विषाणू थैमान घालत असताना दुसरीकडे रविवारी कोकण किनारपट्टीवरील रहिवाशांना तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा सहन करावा लागला. खरंतर समुद्र किनारी राहणाऱ्या कोकणी माणसांना मुसळधार पाऊस वादळी वारे हे काही नवे नाहीत. अशी अनेक वादळे आणि पाऊस त्यांनी अनुभवलाय. मीही त्याला अपवाद नाही. पण रविवारचा अनुभव काही वेगळाच होता. रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जे काही पाहिलं त्याचा केवळ भयावह असाच उल्लेख करता येईल.
खरंतर मे महिन्याच्या मध्यानंतर मान्सूनपूर्व पावसाच्या एकदोन सरी कोसळतात. पण ऐन उन्हाळ्यात असं वादळ आणि असा पाऊस मागच्या दोन तीन पिढ्यांनी अनुभवलेला नव्हता. दोन-चार दिवसांपूर्वी हवामान खात्याने वादळाचा अलर्ट दिल्यानंतर गावातले शेतकरी सावध झाले होते. पावसाळ्यापूर्वी आटोपायची कामे लगबगीने आटोपून घेत होते. त्यातच रविवारी पहाटे चार वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत खबरदारी घेण्याबाबत सावधानतेचा इशारा देणारा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.
अगदी त्याचप्रमाणे शनिवारी रात्रीपासूनच वादळाची चाहूल लागत होती. वारा पिसाटल्यासारखा तिन्ही बाजूंनी वाहत होता ढगांची दाटी होत होती. दरम्यान रविवारी पहाटेपासून वाऱ्यांचा वेग वाढला. वीज कधीच गुल झाली होती. बघता बघता वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला. घोंघावणारा वाऱ्यांचा आवाज धडकी भरवत होता. आजूबाजूला उभी असलेली नारळ, आंब्याची झाडे वाऱ्याचे फटकारे झेलत अस्तित्वाची लढाई लढत होती. मध्येच कुठेतरी एखादे झाड मोडून पडल्याचा, कुठे घरावरील कौले, पत्रे उडाल्याचा मोठा आवाज येत होता. हळूहळू वेळ निघून जात होता. पण वादळ काही थांबवण्याचे नाव घेत नव्हते. बघता बघता घराच्या आसपासची, गावातील अनेक झाडे या वादळासमोर शरणागत होऊन जमीनदोस्त होत होती.
सुमारे १२ ते १६ तास वाऱ्याचे हे बेफाम थैमान सुरू होते. अखेरीस संध्याकाळ होता होता वाऱ्यांनी ओढ घेतली आणि रात्रीच्या आसपास कुठेतरी जीव मुठीत धरून बसलेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. जेव्हा हे सारे थांबले. तेव्हा आसपास केवळ विध्वंसाचेच चित्र होते. कुठे झाडे पडून वाटा बंद झाल्या होत्या. तर कुठे मुसळधार पावसामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कुणाच्या होड्या वाहून गेल्या. तर कुणाचे घर मोडून पडले. या चक्रिवादळाने वीज मंडळाचे आतोनात नुकसान केले. वीजेच्या तारा तुटल्या, खांब कोसळले. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. एकंदरीत पुढची एक दोन वर्षे भरून निघणार नाही, असे नुकसान करून तौक्ते वादळ पुढच्या प्रवासाला गेले. मात्र या वादळाने निर्माण केलेली दहशत आणि नुकसान पुढची अनेक वर्षे लक्षात राहील.