कुडाळ : कुडाळ तालुक्यात झालेले शिक्षकांचे समायोजन हे शासनाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून करण्यात आले असल्याचा आरोप सर्व शिक्षक संघटनांच्यावतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राथमिक शिक्षक समितीचे सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी केला. पती-पत्नी एकत्रिकरण हे शासनाचे धोरण असून याबाबत योग्य निर्णय न झाल्यास आयुक्त स्तरावर तक्रार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यात अतिरिक्त ठरलेल्या ६५ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. परंतु या समायोजन प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाला डावलल्याचा आक्षेप घेत शिक्षक संघटनांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश स्पष्ट करण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार राणे, राज्य महिला उपाध्यक्ष सुरेखा कदम, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष महेश गावडे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजा कविटकर, पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष भिकाजी तळेकर, तालुका सचिव मारुती गुंजाळ, तालुका उपाध्यक्ष उत्तम हरमलकर, कास्ट्राईब महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय कदम आदी उपस्थित होते. यावेळी अणावकर यांनी सांगितले की, समायोजन हे सन २०११ च्या आदेशानुसार दोन वर्षे व्यवस्थित झाले. मात्र, यावर्षी कुडाळ तालुका गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी आदेशाचा चुकीचा अर्थ काढून केले आहे. यात पती-पत्नी एकत्रिकरण होणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता चुकीच्या पध्दतीने समायोजन करण्यात आले. मुळातच समायोजन करताना बदलीचे निकष लावणे अपेक्षित आहेत. ते निकष येथे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पती-पत्नी एकत्रिकरणावर अन्याय झाला आहे, असे त्यांनी सांगितले. इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. याचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणाची वेळ बदलण्यात यावी, तसेच चहा, भोजनाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी करू न विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रशिक्षणांना दांडी मारणार नाही, असे सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुखांनी सांगितले. (प्रतिनिधी)१२ शिक्षकांचा आक्षेपसमायोजन प्रक्रि येमध्ये अतिरिक्त शिक्षक ठरत असतील, तर त्यांचे समायोजन होते. पण हे समायोजन करताना पती-पत्नी एकत्रिकरणाचा मुद्दा प्रामुख्याने घेणे महत्त्वाचे होते. कुडाळ तालुक्यात झालेल्या शिक्षक समायोजनावर १२ शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. त्यात अमोल गोसावी, महेश देवलकर, भास्कर गुंजाळ, दिगंबर नानचे, साधना सूर्यवंशी, विद्या शिरोडकर, रुपाली गवळी, नीला राणे, उज्ज्वला गवस, सायली आटक, संदीप पेडणेकर आदींचा समावेश आहे. आयुक्तांकडे तक्रार करणारकुडाळ तालुक्यात समायोजनाची केलेली प्रक्रिया चुकीची आहे. याबाबत जिल्हास्तरापर्यंत निवेदने दिली आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहोत. तसेच समायोजन प्रक्रियेची तीनवेळा यादी बदलण्यात आली. यातील पहिली यादी योग्य असताना या यादीत बदल का केले, असा प्रश्न राजन कोरगावकर यांनी उपस्थित केला.
कुडाळात शासनाचा आदेश डावलून शिक्षक समायोजन
By admin | Published: July 08, 2014 10:53 PM