ओरोस : काम करणाऱ्या माणसाला नशीब नेहमीच साथ देते. शिक्षकांनी जीव ओतून केलेल्या कामाचे हे फलित आहे. यापुढे जाऊ न शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी बुधवारी केले. जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संग्राम प्रभुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, विभावरी खोत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले, निरंतरचे शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, शिक्षक समितीचे सदस्य संजय बगळे, संघटना प्रतिनिधी राजन कोरगांवकर, म. ल. देसाई, व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच त्यांचे कुटुंबीय आणि शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या सर्व शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रभुगावकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय बगळे आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रदीप मांजरेकर यांचाही यावेळी सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना संग्राम प्रभुगावकर म्हणाले की, प्राथमिक शिक्षण हे अतिशय चांगल्या दर्जाचे दिले जाते. हा दर्जा आणखी सुधारावा यासाठी विस्तृत आराखडा तयार करुन शासनाला जिल्ह्यासाठीचे शैक्षणिक धोरण सादर केले जाणार आहे. जिल्ह्याला देशात स्वच्छतेत क्रमांक १ मिळवून देण्यात शिक्षकांचे कार्य मोलाचे आहे. आत्माराम पालेकर म्हणाले की, शिक्षकांचे काम अतिशय चांगले आहे. एका शिक्षकाच्या गैरवर्तनाचा शिक्का समस्त शिक्षकांवर व त्यांच्या सहकाऱ्यांना लागू नये स्वच्छ जिल्ह्याचा हा बहुमान शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळेच असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी म्हणाले, शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याला आज प्रामाणिकपणाची पोहोच पावती मिळाली आहे. अशा भावना पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या. (वार्ताहर)सत्कारमूर्ती शिक्षक२०१५-१६ चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्यात कुडाळ तालुक्यातील श्यामसुंदर मधुकर सावंत (शाळा पोखरण नं. १), मालवण - विनोद रामचंद्र कदम (मसुरे नं. १), रश्मी प्रमोद पावसकर (शारदा विद्यामंदिर, मळगाव सावंतवाडी), तन्वी किरण रेडकर (मुख्याध्यापिका उभादांडा वेंगुर्ले), चंद्रकांत साळुंखे (देवगड), प्रभाकर कोकरे (वैभववाडी), विद्याधर तांबे (शाळा- नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट) यांचा समावेश आहे.
गुणवत्तेत अग्रेसर होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत
By admin | Published: October 06, 2016 11:22 PM