सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात एसटी महामंडळाला अपघातांचे ग्रहण लागले की काय? असा प्रश्न पडत आहे. देवगड तालुक्यातील शिरगाव अपघातानंतर वेंगुर्ला तालुक्यात मातोंड आणि आज गुरुवारी आसोली वडखोल येथे भरधाव वेगाने येणार्या टेम्पोची एसटीला धडक बसून दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास आसोली-वडखोल येथे घडला.दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत जाग्यावर गाडी थांबविल्याने मोठा अपघात टळला. तर टेम्पोच्या मागील हौद्यात बसलेल्या एका चिमुकलीसह परप्रांतीय कामगार बालंबाल बचावले.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित एसटी वडखोलच्या दिशेने जात होती. यावेळी अवघड वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली. टेम्पोच्या टायरची झीज झाल्यामुळे ब्रेक लावून सुद्धा चालकाला त्यावर ताबा मिळवता आला नाही. दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी जागेवरच थांबविल्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली. मात्र तरीसुद्धा दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यात टेम्पोच्या समोरील भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला. तर एसटीच्याही समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त एसटीत कोणीही प्रवासी नव्हते. मात्र टेम्पोच्या हौद्यात बसलेल्या एका चिमुकलीसह परप्रांतीय कामगार बालंबाल बचावले.
सिंधुदुर्गात एसटीची अपघातांची मालिका, आसोली-वडखोलत टेम्पो व एसटीत धडक; आठवड्यात तिसरी घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 15, 2022 12:45 PM