ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस खर्येवाडी येथील हॉटेल निखिल-पियासमोर अज्ञात आशयर टेम्पोने दुचाकीवरून पणदूर हायस्कूलमध्ये जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कसाल हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे निवृत्त शिक्षक शंकरराव कोकितकर यांचा मुलगा देवेंदू (वय १८) हा जागीच मृत झाला, तर त्याच्यामागे गाडीवर बसलेला आशिष गुरुसिद्धा कांबळे (१८) हा किरकोळ जखमी झाला. याबाबत अधिक वृत्त असे की, देवेंदू शंकरराव कोकितकर आणि आशिष कांबळे हे दोघेही पणदूर हायस्कूलमध्ये बारावीमध्ये शिकत होते. सोमवारी शाळेला जाण्यासाठी आशिष हा जैतापकर स्टॉपवर उभा होता, तर देवेंदू हा आपल्या आई-वडिलांसह गावी चंदगड येथे जत्रेसाठी व देवदर्शनासाठी जाणार होता. त्यामुळे त्याने सुटी घेतली होती. तो नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता वडिलांची दुचाकी (एमएच ०७, ई-९३२४) घेऊन बाहेर पडला. त्याचवेळी समोरच्या बसस्टॉपवर मित्र आशिष शाळेत जाण्यासाठी उभा होता. देवेंदू याने आशिष याला ‘तुला शाळेत पोहोचवून येतो’ असे सांगितले. मात्र, आशिषने त्याला नकार देत आपण एस.टी.बसने जात असल्याचे सांगितले. तरीही देवेंदू याने न ऐकता त्याला दुचाकीवर बसवून काही अंतरावरच जाताच ओरोस खर्येवाडी येथील हॉटेल निखिलपियासमोर कणकवलीकडे जाणाऱ्या एका अज्ञात आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. ती धडक इतकी जोराची होता की, देवेंदू याचा यात जागीच मृत्यू झाला, तर आशिष दूरवर फेकला गेल्याने यामध्ये किरकोळ जखमी झाला. (वार्ताहर)
टेम्पोच्या धडकेने विद्यार्थी जागीच ठार
By admin | Published: December 28, 2015 11:43 PM