कणकवली : येथील नगरपंचायतीचा सन २0१६-१७ चा १0 कोटी ३१ लाख १२ हजार ५९९ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सोमवारी सभागृहात सादर करण्यात आला. पाणी पट्टी, बाजार कर, भोगवटा तसेच फेरफार शुल्क असे कर वाढ करून नगरपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २८ कोटी २१ लाख ३२ हजार ५९९ रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे.येथील नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात सोमवारी झाली. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, सहाय्यक मुख्याधिकारी महाडिक, लेखाधिकारी कल्पना बागवे आदी उपस्थित होते. प्रारंभीची शिल्लक १३ कोटी ९१ लाख ३३ हजार २९९ रूपये असून त्यावर आधारित हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भुयारी गटार योजनेच्या समावेशामुळे दरवर्षी कणकवली नगरपंचायतीचा अर्थसंकल्प फुगलेला दिसायचा. मात्र, यावर्षी या योजनेचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. अशी माहिती उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी सभागृहाला दिली. तर राज्यस्तरीय नगरोत्थान अभियानांतर्गत कणकवली शहरातील भुयारी गटार योजनेचा समावेश झाला तर अधिक निधी आपल्याला मिळू शकेल अशी माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी यावेळी दिली. तर चर्चेअंती या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा पाठविण्यात यावा तसेच राज्यस्तरीय नगरोत्थानमध्ये कणकवलीच्या या योजनेचा समावेश करून निधीची तरतूद शासनाने करावी यासाठी पाठपुरावा करण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. राज्य तसेच केंद्रात सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी आपली ताकद वापरून हा प्रस्ताव मंजूर करावा अशी कोपरखळी समीर नलावडे यांनी यावेळी मारली. विविध कर तसेच मालमत्तांचे भाडे या माध्यमातून नगरपंचायतीकडे ६ कोटी ८८ लाख ८९ हजार ३00 रूपये जमा होतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर आस्थापना खर्च १ कोटी ३५ लाख ५६ हजार, प्रशासकीय खर्च ६६ लाख ७९ हजार, व्यवहार व कार्यक्रम अंमलबजावणीकरता खरेदी १ कोटी ४४ लाख ६१ हजार रूपये असा विविध कारणांसाठी ५ कोटी ७६ लाख ४९ हजार रुपये इतका महसुली खर्च अपेक्षित आहे. भांडवली जमा ७ कोटी ४१ लाख १0 हजार रूपये होतील. तर भांडवली खर्च ७ कोटी ३ लाख १0 हजार रुपये होईल.फी वापरकर्ता आकार आणि द्रव्य दंडअंतर्गत नगरपंचायतीला २ कोटी ३0 लाख ४६ हजार ८00 रूपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या मालमत्ता व इमारती यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ८४ लाख ११ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तर वायफाय सेवेसाठी ६ लाख, सीसीटीव्हीसाठी ३ लाख, जीपीएस सेवा ५ हजार, ई-निविदा सेवेसाठी १ लाख ५0 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पर्यटन महोत्सवासाठी १0 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.नगरपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठीही काही उपाय योजण्यात येत आहेत. यामध्ये मच्छी मार्केट मधील गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट पाणीपट्टी म्हणजे १00 रुपये आकारण्यात येणार आहेत. प्रत्येक नळ जोडणीला लवकरच मीटर बसविण्यात येणार असून तोपर्यंत ही पाणी पट्टी नागरिकांना भरावी लागणार आहे. मीटर बसविण्यात आल्यानंतर त्याप्रमाणे पाणी पट्टी आकारली जाईल असे यावेळी सभागृहात स्पष्ट करण्यात आले. बाजार कर, फेरफार शुल्क, भोगवटा शुल्क यामध्येही वाढ करण्यात आली आहे. काही मोफत सेवांना आता कर आकारला जाणार आहे.शहरातील विविध विकास कामांसाठी जागेची आवश्यकता भासत आहे. जागा संपादन करायची म्हटली तर त्यासाठी खूप निधी लागणार आहे. त्यामुळे संबंधीत जागा मालकाना टीडीआर दिला तर ते आपली जागा निश्चितच देतील यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी सुशांत नाईक, राजश्री धुमाळे, बंडू हर्णे यांनी यावेळी केली. माजी नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, मेघा गांगण, नगरसेवक किशोर राणे हे या सभेला अनुपस्थित होते. (वार्ताहर)माधुरी गायकवाड, कन्हैया पारकर : सर्वसामान्यांसाठीचा अर्थसंकल्पशहरातील सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. पर्यटन महोत्सव तसेच वायफाय सेवा,शहरात सीसीटीव्ही बसविणे अशा गोष्टींसाठी नवीन हेड तयार करून निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी गुरख्यांची नियुक्ती करण्याबाबतही तरतूद करण्यात आली आहे. आजची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व नगरसेवकांनी सभागृहात साथ दिली.असाच विश्वास नगरसेवकांनी ठेवल्यास शहराचा विकास निश्चितच करू, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर व्यक्त केली.सीसीटीव्हीसह इतर कामांसाठी तरतूद वाढवाशहराच्या सुरक्षततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही आवश्यक असून त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात यावी.तसेच स्मशानभूमितील लाकडे, आरोग्य सेवा, ड्रेनेज सिस्टिम, सर्वजनिक उद्यानातिल खेळणी अशा लोकोपयोगी गोष्टींसाठी वाढीव तरतुदीची मागणी नगरसेवक समीर नलावडे,अभी मुसळे,बंडू हर्णे आदी नगरसेवकांनी यावेळी केली.
दहा कोटी शिलकीचा अर्थसंकल्प
By admin | Published: February 29, 2016 10:49 PM