वैभववाडी : नोटीस आणि दंडात्मक कारवाई करुनसुद्धा सुरु असलेली शहरातील दहा दुकाने नगररपंचायतीने सील केली. याशिवाय विनाकारण शहरात फिरणाऱ्या पाच जणांवर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये मेडिकल, किराणा, भाजीपाला, हॉटेल आदीचा समावेश आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानदारांनीही दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे. नगरपंचायतीकडुन यापुर्वी या दुकानांना नोटीस देण्यात आली होती.त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. परंतु या कारवाईकडे दुर्लक्ष करीत शहरातील काही व्यापाऱ्यांनी आज सकाळी पुन्हा दुकाने उघडली.त्यामुळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी ही दुकाने सील केली. यामध्ये कपडे, चप्पल, इलेक्ट्रीक, स्टेशनरी आदी दुकानांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये हलचल निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी पोलीसांनी कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून पोलीस निरीक्षक अतुल जाधव स्वतः शहरात फेरफटका मारत होते. बाजारपेठेत विनाकारण फिरत असलेल्या पाच जणावर दंडात्मक कारवाई केली.