राजन वर्धन- सावंतवाडीराज्याच्या शिक्षण खात्याने चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीत घेण्याचा निर्णय तत्काळ अंमलात आणला आहे; पण दरवर्षी घेतली जाणारी पाचवीच्या वर्गासाठीची नवोदयची परीक्षासुद्धा असल्याने विद्यार्थ्यांना एकाच वर्षी दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार आहेत. नवोदय परीक्षा ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिशा देणारी असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यात चिंता निर्माण झाली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीत घेण्याचा निर्णय घेतला. तो सर्व शाळांत तत्काळ अंमलात आणण्याची कार्यवाहीही केली. त्यामुळे चौथी इयत्तेच्या, म्हणजेच पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांची क्षमता नसतानाही द्याव्या लागणाऱ्या या परीक्षेबाबत रणकंदन उठवणाऱ्यांचाही आवाज बंद झालाच; पण या मनस्थितीच्या पालकांतही आनंदाचे वातावरणही दिसू लागले; पण चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आयुष्यातील सर्व स्पर्धा-परीक्षांची पायाभरणी असल्याचे कित्येक वर्षांचा स्वानुभव अनेक पालकांचा आहे. कारण चौथीचे वर्ष म्हणजे पालकांसाठी आपल्या पाल्याच्या बुद्ध्यांकाची चाचपणी असायचीच; पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही चौथीच्या वर्गाचे एक वेगळेच महत्त्व असायचे. तर चौथीचा वर्ग कोणत्या शिक्षकाकडे असावा, हेही त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे महत्त्वपूर्ण काम मानले जायचे. याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीही याकडे गांभीर्याने पहायची; पण चौथीची परीक्षाच रद्द केल्याने या सर्व गोष्टींचे किंबहुना चौथीच्या वर्गाचेच महत्त्व लोप पावले आहे. शिक्षण विभागातील हा ताजा बदल तसा कुुणाच्याही पचनी पडलेला नाही.दरम्यान, या निर्णयामुळे चौथीच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांचाही ताण थोडा कमी झाला असे नाही. कारण यंदा नाही, तर पुढच्या वर्षी तरी नक्कीच त्यांच्यावर हा भार पडणार आहे; पण चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तिसरी इयत्तेपासूनच शिकवण्या सुरू करणाऱ्यांची यामुळे गोची झाली. प्राथमिक शाळेतील गतवर्षीच्या तिसरीच्या वर्ग शिक्षकांनी चौथी शिष्यवृत्तीचे नियोजन करून अनेक दिवस जादा तासिका घेत अभ्यासक्रम निम्म्यावर आणला होता; पण या निर्णयाने त्यांच्याही प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. याही पलीकडचे वास्तव म्हणजे, या वर्गातील शिक्षक, पालक, विद्यार्थी व खासगी शिकवण्यावाल्यांना सलग तीन वर्षे शिष्यवृत्तीचा अभ्यास करावा लागणार आहे. तिसरीत झालेला, चौथीत पूर्वतयारीचा आणि पाचवीत होणाऱ्या परीक्षेसाठी या अभ्यासात डोके खुपसून बसावे लागणार आहे. हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे, तो केवळ नव्या निर्णयामुळेच. शिक्षण खात्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने का झाली, याबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, ही घाई करण्यापेक्षा याबाबत विचार झाला असता, तर या निर्णयात नक्कीच सुधारणा करता आली असती; पण ना विचार ना चर्चा. केवळ काही तरी धडाडीचा निर्णय घेण्याच्या दृष्टीनेच हाही निर्णय घेतल्याचे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे; पण याला विरोध करणारे कोणीच पुढे येत नाही. दर पाच वर्षांनी येणाऱ्या नव्या शिक्षणमंत्र्यांचा जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत करणे हा फंडा या निर्णयातही दिसून आला. मात्र, पाचवीत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय परीक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे एकतर विद्यार्थ्यांना पाचवीच्या वर्गात दोन्ही परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. नाहीतर कोणत्यातरी एकाच परीक्षेची सचोटीने तयारी करावी लागणार आहे, अन्यथा दोन्ही परीक्षेच्या नादात विद्यार्थी गोंधळात सापडून काहीही अनपेक्षित घडू शकते. त्यामुळे एकाच वर्षी दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा असणे तसे घातकच आहे. नवोदय परीक्षेबाबत अजूनतरी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. ही परीक्षा पालक, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची अशीच आहे. त्यामुळे या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जायचे; पण पाचवीत होणाऱ्या दोन्ही परीक्षांनी पालक, विद्यार्थी व शिक्षकही गोंधळला आहे.शासनाच्या निर्णयानुसार शिष्यवृत्तीची परीक्षा पाचवीत म्हणजे पुढच्या वर्षी होणार आहे. तर नवोदय परीक्षा ही कें द्र स्तरावरील असून तीही पाचवीतच होते. राज्याच्या अखत्यारीत असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करता येऊ शकतो; पण नवोदय परीक्षेत काहीही बदल राज्यांना करता येत नाहीत. नवोदय परीक्षेच्या बदलाबाबत अजूनतरी कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय या दोन्ही परीक्षा पुढच्या शैक्षणिक वर्षांत एकाच वेळी द्याव्या लागणार आहेत. - एस. के. देसाईगटशिक्षणाधिकारीपंचायत समिती, सावंतवाडीचौथीऐवजी पाचवीत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा तशी अडचणीची आहे. एकाच वर्षी मुलांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचा ताण सोसणार नाही. खात्याने याबाबत गांभीर्याने विचार करून शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणेच घ्यावी. जेणेकरून मुलांना शिष्यवृत्ती व नवोदय या परीक्षांना आवश्यक वेळ मिळू शकतो.- सुमिता देसाईपालक, सावंतवाडी ‘ती’ मंडळी चिडीचूपशिष्यवृत्ती परीक्षा पाचवीत गेल्याने क्षमता नसतानाही घेण्यात येणाऱ्या चौथीच्या मुलांवर हा अन्याय होतो, अशी काहीजणांची ओरड होती; पण या नव्या निर्णयाने पाचवीच्या विद्यार्थ्यांवर दोन परीक्षांचा ताण पडणार आहे. याबाबत मात्र ही मंडळी चिडिचूप आहेत. त्यामुळे या निर्णयाविरोधात ते नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत औत्सुक्य आहे.
एकाच वर्षी दोन्ही परीक्षांचा ताण
By admin | Published: August 12, 2015 8:40 PM