मालवण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्हा व राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा विचार करता सर्व प्रकारचे जलक्रीडा प्रकार, साहसी पर्यटन, नौकाविहार तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.तहसीलदार यांच्या दालनात आमदार नाईक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, पर्यटन, पोलीस आदी यंत्रणांकडून आढावा जाणून घेतला.
यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, गणेश कुडाळकर, प्रवीण रेवंडकर आदी उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची रविवारपासून तपासणी केली जात आहे. आतापर्यंत कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण तपासणीत आढळून आला नसून आरोग्य यंत्रणेकडून सर्वप्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था केली जाणार आहे, असे तहसीलदार पाटणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील सर्व पर्यटन व्यवसाय ठप्प होणार आहेत.गोव्यातील गाड्यांना बंदी, जलक्रीडा, पर्यटन व्यवसाय बंदीचे आदेशसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूंचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, यासाठी परराज्यातील तसेच अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या बंद करायला पाहिजेत. मात्र, कोरोनाची लक्षणे आढळून न आल्यास पर्यटक किंवा रुग्णांची हेळसांड करू नका, अशा सूचना आमदार नाईक यांनी प्रशासनाला दिल्या.
गोवा राज्यातून स्कुबा डायव्हिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून विदेशी पर्यटकांची तपासणी करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत, असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.तहसीलदार पाटणे यांनी बंदर विभागाला सर्व प्रकारचे जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात जलक्रीडा प्रकल्प, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, किल्ला होडी प्रवासी वाहतूक, नौका विहार आदी पर्यटन व्यवसाय पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे. शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून पर्यटन व्यवसाय सुरू राहिल्यास संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पाटणे यांनी स्पष्ट केले.