सावंतवाडी : एका दिवसाच्या आठवडा बाजाराने मोती तलावाचे सौंदर्य बाधित होणार म्हणून ओरड मारणाऱ्या मंत्री केसरकर यांनी पंधरा वर्षांत किती रोजगार दिले? दहशतवादाचा डोलारा पिटणारे आता सौंदर्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत अशी जोरदार टिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. तसेच मोती तलावाकाठी असलेला बाजार हलविल्यास भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सत्यवान बादेकर उपस्थित होते.परब म्हणाले, मंत्री केसकर यांनी अलीकडेच आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्याबाबत आपण ठाम असल्याचे जाहीर केले होते. मात्र जनतेला फसवण्याचे सोडून द्यावे, जनता तुम्हाला कंटाळली आहे. एवढे दिवस दहशतवाद करून राजकारण करणाऱ्या केसरकर यांनी आता मोती तलावाच्या सौंदर्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसाच्या आठवड्या बाजाराने मोती तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही ज्यावेळी आठवडा बाजार भरतो त्यानंतर ताबडतोब पालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी स्वच्छता केली जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अस्वच्छता ही तिथे होत नाही. पूर्वी ज्या ठिकाणी बाजार भरत होता तेथे महिला वर्गांना होणारा त्रास त्यांच्या बाबतीत होणारे गैरप्रकार व अन्य गोष्टींचा विचार करून हा आठवडा बाजार तलावाच्या काठी भरवण्यात आला. गेली दोन वर्ष कुठल्याही प्रकारची तक्रार न येता हा आठवडा बाजार येथे सुरळीतपणे सुरू आहे. व्यापारी वर्ग नागरिकांनाही हा बाजार योग्य आणि सोयीचा वाटतो. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी जनतेला दिलेली आश्वासने आणि रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतच बोलावे उगाच आठवड्या बाजारासारख्या विषयावर बोलू नये.आम्ही सत्तेत आल्यानंतर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना विश्वासात घेऊनच त्यांच्याशी चर्चा करून आठवडा बाजार तलावा काटे भरवण्याबाबत निर्णय घेतला होता. तसा ठरावाही मासिक बैठकीमध्ये घेतला आहे. सद्यस्थितीत हा आठवडा बाजार होळीचा खुंठ येथे हलवण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र तेथील जागेचा विचार करता तेथे असणारी स्वच्छतागृहांची वानवा तसेच मुख्य बाजारापासून ही जागा दूर असल्याने गैरसोय होणार आहे. त्यामुळे तलावाकाठील आठवडा बाजार दुसरीकडे हलवताना आम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, अन्यथा त्याला भाजपचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवाद झाला आता सौंदर्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल, संजू परबांची केसरकरांवर टीका
By अनंत खं.जाधव | Published: March 10, 2023 3:54 PM