मालवण : निवडून गेलेल्या आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनीही तारकर्ली देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांकडे पाठ फिरविली आहे. आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री दीपक केसरकर हे सूडबुद्धीचे राजकारण करीत आहेत. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यामुळेच तारकर्ली देवबाग येथील ग्रामस्थांना पर्यटन उद्योगातून रोजगाराची संधी मिळाली आहे. हा रोजगार कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर व पंचायत समितीचे उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.येथील काँग्रेस कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरअनधिकृतपणे धनदांडग्यांकडून वाळू उपसा केला जात आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणा दिवसाढवळ्या होत असलेल्या वाळू उपशाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहेत. प्रशासनाला राजरोसपणे चाललेला अनधिकृत वाळू उपसा दिसत नाही. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून गोरगरीबांवर गुन्हे दाखल करण्याचे काम प्रशासनाने अवलंबिले आहे. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढत असताना फक्त तारकर्ली व देवबाग येथीलच पर्यटन व्यावसायिकांवर त्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले ही बाब गंभीर असतानाही पालकमंत्री, खासदार व आमदार या भागात फिरकलेसुद्धा नाहीत. पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक सूडबुद्धीचे राजकारण करीत असून ते पर्यटन जिल्ह्याचे वाटोळे करणार असल्याची टीका कोळंबकर यांनी केली.यावेळी देवानंद चिंदरकर म्हणाले, तारकर्ली, देवबाग, वायरी गावातील ग्रामस्थांनी शासनाकडे कोणत्याही निधीची मागणी न करता तसेच शासनाच्या कोणत्याही योगदानाशिवाय गावात स्वखर्चाने रोजगार उपलब्ध केला आहे. असे असताना येथील २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमसीझेडएमएचे दोन दिवसांत परवाने मिळवून एमटीडीसीने आपल्या इमारती अधिकृत ठरविल्या आहेत. सीआरझेडबाबत स्थानिकांत अनभिज्ञता असल्याने अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबत मार्गदर्शन मागण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आतातरी ज्याप्रमाणे एमटीडीसीने आपल्या इमारती अधिकृत केल्या त्या प्रक्रियेची आम्हांला माहिती देऊन सहकार्य करावे असे देवानंद चिंदरकर म्हणाले. त्याचप्रमाणे अकृषक कराची भरणा करून घेऊन अनधिकृत पर्यटन व्यावसायिकांना अधिकृत करून घ्यावे अशीही मागणी चिंदरकर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संजीवनी लुडबे, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, भाई मांजरेकर, महेश लुडबे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदार, खासदारांची पर्यटनाकडे पाठ
By admin | Published: April 02, 2015 10:58 PM