कणकवली : उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या लालसी वृत्तीने सत्ता तसेच पक्ष, चिन्ह गेले. सोबतचे सहकारी सुद्धा साथ सोडून गेले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठाकरे पूर्णपणे हरणार आहेत. त्यामुळे भाजपा नेत्यांवर टीका करायची, शिव्या द्यायच्या आणि राडे घडवून आणायचे असे षडयंत्र ठाकरे यांचे आहे. त्याचा पहिला अंक तळकोकणात ठाकरेंनी केला. अशी टीका भाजपा रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. कणकवली येथील शासकीय विश्राम गृह येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी महिला मोर्चा प्रदेश महामंत्री डॉ.मंजुषा कुद्रीमोती, प्रदेश सचिव हर्षदा देसाई, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, प्रसाद जाधव, बबलू सावंत आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, कुटुंब संवाद नावाचे टुरिंग टॉकीज घेऊन उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले होते. मुळात ठाकरे कुटुंबात संवाद नाही, त्यांचा स्वतःचा सख्खा भाऊ सोबत राहत नाही. राजकारणात प्रगल्भ असणाऱ्या राज ठाकरे यांना बाजूला केलेल्या औरंगजेबी वृत्तीने वागणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या कुटुंबाशी संवाद साधावा. जे बाळासाहेबांनी आयुष्यभर कमावले ते उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मोहापायी गमावले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांचे एकमेव विरोधक उद्धव ठाकरे यांची सत्तेच्या लालसेची वृत्ती होती. बाळासाहेबांनी धरावे म्हटले तर उद्धव यांनी मारावे म्हणत 'ध'चा 'मा' केला.कणकवली येथील सभेतील भास्कर जाधव यांच्या भाषणातून नेमके नशा करून कोण आले होते हे जनतेने बघितले. जाधव आपल्या भाषणातून वैभव नाईक यांना उद्धव ठाकरे म्हणत होते. पौष महिन्याला डिसेंबर महिना म्हणत होते.भाजपा सरकारचे जनतेला अपेक्षित असे काम केंद्र आणि राज्यात सुरू आहे. कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला. ५० कोटींचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला म्हणून उर फोडून रडणारे विनायक राऊत यांनी ३ लाख कोटींची गुंतवणूक असणारा, कोकणातील प्रत्येक बेरोजगाराला रोजगार देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. जोपर्यंत विनायक राऊत, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे कोकणातील खासदारकी राहील तेवढा काळ कोकणचा विकास कधीच होणार नाही. असेही प्रमोद जठार म्हणाले.विनायक राऊत यांना हरवायला तोफगोळे आवश्यक नाही!रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून ठाकरे शिवसेनेकडे राऊत यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही. मात्र, भाजपा महाविकास आघाडीकडे लोकसभेसाठी उमेदवारांची रांग लागली आहे. आमच्याकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे किरण सामंत यांच्यासारखे उमेदवार आहेत. मात्र विनायक राऊत यांना हरवायला हे तोफ गोळे आणण्याची आम्हाला गरज नाही. त्यांच्यासाठी माझ्यासारखी तलवारच पुरेशी आहे असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.
भाजपा नेत्यांवर टीका करून राडे घडवून आणायचे हे ठाकरे सेनेचे षडयंत्र, प्रमोद जठार यांचा आरोप
By सुधीर राणे | Published: February 06, 2024 3:10 PM