कणकवली: सत्ता आणि पैशाच्या गुर्मीतूनच देवगड येथे सरकारी रुग्णालयाच्या दुरवस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाणीचा प्रयत्न झाला आहे. मात्र, कोकणात कुणाचाही माज जास्त काळ चालत नाही. हे राणे यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये अनुभवले आहे. २०२४ मध्ये कणकवलीत त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असून नितेश राणेंना आता जनताच धडा शिकवेल असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लगावला. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकशाहीत जनतेचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम आहे. आमच्या शिवसैनिकांनी ते काम केले. नांदेडसारखी घटना देवगड, कणकवली किंवा सिंधुदुर्गात घडू नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या शिवसैनिकांना नितेश राणे यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. आमदार स्वतः आमच्या शिवसैनिकाला खेचून गाडीत घेऊन जात होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांची दांडगाई सुरु होती. तर पोलिस बघ्याची भूमिका घेत होते. सिंधुदुर्ग मागास होत असल्याचे हे निदर्शक आहे. पण, शिवसेना तसे कधीही घडू देणार नाही, हे लक्षात ठेवावे. यात पोलिसांनी जी भूमिका घेतली, ती संशयास्पद आहे. पोलिस निरीक्षकांसमोरच देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? याचा जाब आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांना विचारणार आहोत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या खात्याच्या शिस्तीचा टेंभा मिरवीत असतात. मात्र देवगडमध्ये त्यांच्या खात्याची अब्रू त्यांच्याच आमदाराने धुळीस मिळवली आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर असे शेकडो गणेश गावकर गावागावात तयार होतील आणि कामाचा जाब विचारतील, हे लक्षात ठेवावे.जनतेचे प्रश्न आमदारांसमोर मांडायचे नाहीत तर काय अमेरिकेच्या अध्यक्षासमोर मांडायचे का? हे राणे यांनी स्पष्ट करावे. जनतेचा आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकांना झालेली मारहाण आम्ही कदापिही सहन करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना आम्ही देवगडच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभी करू. देवगडला समंजस नेतृत्वाची परंपरा आहे. आप्पासाहेब गोगटे, अमृतराव राणे अशा सुसंस्कृत लोकांनी देवगडचे प्रतिनिधित्व केले आहे. आम्हाला त्या आमदारांचा अभिमान आहे. मात्र, नितेश राणे यांनी त्या गौरवशाली परंपरेला छेद दिला आहे. शांतताप्रिय देवगड तालुक्यातील जनतेने हे लक्षात घ्यावे. तसेच भाजपला आगामी निवडणुकीत धडा शिकवावा.
कणकवलीत 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार, संदेश पारकर यांची नितेश राणेंवर टीका
By सुधीर राणे | Published: October 10, 2023 3:36 PM