सिंधुदुर्ग : कोकणवासीय ज्याची आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. ह्या जत्रेसाठी आवर्जून भक्तगण कोकणात येतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव खूप साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने कोकणवासीय आंगणेवाडीची जत्रेस येऊ शकतात. मालवणला असणारी ही आंगणेवाडीची जत्रा २४ आणि २५ फेब्रुवारीला होत आहे. भराडी देवीच्या दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात हे विशेष त्यामुळेच या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती कोकणवासीयांना दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून हे उत्सव साजरे केले जातील. या उत्सवाला प्रशासनाने सहकार्य राहिल. उत्सवात सर्व नियमाचे पालन करण्यात येणार असल्याचे या बैठकीस मान्य करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला भाविकांसोबतच अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी ही आवर्जुन हजेरी लावतात. या जत्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय ही केली जाते. उत्सवाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियम लागू करण्यात आले असून ह्या नियमांचे पालन करूनच आंगणेवाडीची जत्रा पार पडणार आहे.
कोरोना नियमांचे पालन करूनच आंगणेवाडीची जत्रा पार पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 6:51 PM