कणकवली - कणकवली बस स्थानकासमोर एका अज्ञात वृद्ध व्यक्तीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी मिळाला होता. त्याची ओळख आता पटली आहे. कणकवली, टेंबवाडी येथील रहिवासी असलेले व २८ ऑगस्ट पासून बेपत्ता झालेल्या मूळ फोंडाघाट, पावणादेवी मधील बाळकृष्ण शांताराम तावडे (वय ७०) यांचा तो मृतदेह असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याबाबत माहिती देण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी तावडे यांच्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती विचारत खातरजमा केली. त्यानंतर तावडे यांचे दफन केल्यानंतरचे ठेवलेले कपडे त्यांच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आले व त्यावरून अखेर ही ओळख पटली आहे. असे बापू खरात यांनी सांगितले.
पोलिसांनी या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याकरता अनेकदा प्रसिध्दी माध्यमांमधून आवाहन केले होते. बाळकृष्ण तावडे यांचा मुळगाव फोंडाघाट हा आहे. त्यांचा मुलगा आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सवाकरिता फोंडाघाट येथे मूळ घरी गेला होता. बाळकृष्ण तावडे हे त्यांच्या पत्नीसोबत कणकवली टेंबवाडी येथे राहत असत. २८ ऑगस्ट रोजी मुलगा मनोज तावडे यांनी वडिलांना उद्या सकाळी घेऊन फोंडाघाट येथे जायचे असल्याबाबत आपल्या आईला फोन केला होता. मात्र त्यावेळी तिने बाळकृष्ण तावडे हे दुपारी घरातून निघून गेले ते परत आले नसल्याचे सांगितले. बाळकृष्ण तावडे यांना अधून मधून घरात काही न सांगता निघून जायची सवय होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. नातेवाईकांकडे माहिती घेतली. मात्र त्यांचा शोध लागत नव्हता. बाळकृष्ण तावडे हे एसटी विभागामध्ये चालक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
दरम्यान, बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू हा विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून झाला असल्याचे पोस्टमार्टममध्ये निष्पन्न झाले होते. तसेच विद्युत निरीक्षकांकडूनही त्या घटनेला दुजोरा देण्यात आला होता. मात्र, अद्याप तसा लेखी अहवाल देण्यात आलेला नाही असे बापू खरात यांनी सांगितले. त्यामुळे जर दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाई मुळे बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू झाला असेल तर संबंधित ठेकेदार कंपनीने तावडे यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.