रजनीकांत कदम
कुडाळ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या मतदारसंघातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना २६,२३६ एवढे मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात झालेल्या वाढीव मतदानाचा फायदा निश्चितच महायुतीला म्हणजेच नारायण राणे यांना झाला आहे.महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी या मतदारसंघात मोठ्या सभांऐवजी कॉर्नर सभा, छोट्या सभा, कार्यकर्ता मेळावे, मतदार प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे अशी प्रचार यंत्रणा जोरदार राबवली. तसेच पदाधिकाऱ्यांना विविध प्रभागांच्या जबाबदाऱ्या देऊन प्रचार करायला सांगितला होता. महाविकास आघाडीने खळा बैठका घेऊन विशेष प्रचार केला होता. मात्र, महायुतीच्यावतीने सुसूत्रबद्धपणे केलेल्या प्रचाराचा परिणाम मताधिक्य वाढण्यात झाला.
विजयाची कारणे
- जोमाने प्रचार
- महायुतीतील पक्षांनी पक्ष संघटना मजबूत बांधली. त्यामुळे मताधिक्य वाढण्यास मदत झाली.
- महायुतीने या मतदारसंघातील विकासकामे, तसेच मतदारसंघातील प्रश्न, समस्या या मुद्यांवर आघाडी घेतली.
- माजी खासदार नीलेश राणेंसह महायुतीतील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केला.
पराभवाची कारणे
- पक्षफुटीचा परिणाम
- शिवसेना पक्षफुटीचा परिणाम झाला.
- विनायक राऊत यांच्यासोबत भाजपा नसल्याने मताधिक्य घटले.
- मशाल हे पक्ष चिन्ह नवीन असल्याने ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. ते कार्यकर्त्यांना शक्य झाले नाही.
- प्रचार यंत्रणा काही ठिकाणी कमी पडली. शिवसेना व राष्ट्रवादी फुटीचा परिणाम भाजपाला फायदेशीर ठरला.