सिंधुदुर्ग : कोकणचे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही आहे. सोशल मीडियावर मागील दोन दिवसांपासून या जत्रोत्सवाच्या तारीख निश्चिती बाबत चुकीचे संदेश प्रसारित होत असून आंगणे कुटुंबियांकडून जत्रोत्सवाच्या तारखे बाबत अधिकृत घोषणा जो पर्यंत केली जात नाही तो पर्यंत या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.आंगणेवाडी भराडी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती सर्वत्र पसरल्याने दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्र राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असल्याने गर्दीचा महापूर पहायला मिळतो. मुंबईतील सर्व चाकरमानी या जत्रोत्सवाला मोठ्या संख्येने येत असतात. मुंबईतील राजकीय नेतेमंडळी आर्वजून येत असल्याने जत्रोत्सव कालावधीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल पहायला मिळते.आंगणेवाडी ग्रामस्थ या सर्व यात्रेकरू भाविकांची सेवा करतात. त्यांना वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देतात. म्हणून दरवर्षी भाविकांच्या उपस्थितीत वाढ होत जाते. भराडी देवी मंदिरात अजून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यानंतर जत्रेची तारीख ठरविली जाते. अद्याप तारीख ठरलेली नाही, असे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने स्पष्ट केले आहे.
आंगणेवाडी जत्रोत्सवाची तारीख अद्याप निश्चित नाही!, आंगणे कुटुंबियांची माहिती
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 16, 2023 2:09 PM