- अनंत जाधव
सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना दिलेला पाठींबा शिवसेना भाजप युतीच्या दृष्टिने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला मला व मुख्यमंत्री यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मंगळवारी सावंतवाडीत आले असता केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी केसरकर म्हणाले, शिवसेनेकडून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले. हे शिवसेना भाजपा युतीच्या दृष्टिने एक मोठे पाऊल टाकले आहे. हेच सर्व खासदार आमदार आणि शिवसैनिकांचे मत आहे. त्यांनाही या निर्णयाने बरे वाटले असेल, असेही केसरकर यांनी सांगितले. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी मला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले असून हा खरोखरच माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचे यावेळी ते म्हणाले.
दरम्यान, एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.