सावंतवाडी: सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे हे सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळणार आहेत.या बदलीचे आदेश गुरूवारी निघाले असून जावडेकर यांना अद्याप पर्यत कुठेही नेमणूक देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, मुख्याधिकारी जावडेकर यांना पालकमंत्र्याची नाराजी भोवल्याची चर्चा सध्या जोर धरत असून त्यामुळेच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या कारणातून वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या विरोधात सर्वांचीच मोठी नाराजी होती विशेषता घरपट्टी वाढीवरून तर त्यांना सर्वच पक्षांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.त्याशिवाय भ्रमणध्वनी न उचलणे नागरिकांना कुणाला वेळ न देणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याबाबत करण्यात आल्या होत्या विशेषता सावंतवाडी मोती तलाव तील गाळ काढण्या बाबत गेले अनेक दिवस स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण आग्रही असताना काम सुरू करण्यात आले नव्हते त्यामुळे ते मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराज होते.तसेच आठवडा बाजारावरून ही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जावडेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती.
त्यामुळे जावडेकर यांची लवकरच बदली होणार हे निश्चित मानले जात होते. त्यातच आज नगरविकास विभागाने याबाबतचे अधिकृत आदेश काढले असून ते सावंतवाडी नगरपालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत.यात सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांची वर्णी लागली आहे तर जावडेकर यांना अद्याप पर्यंत कुठेच पदस्थापना दिली गेली नाही.