दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : गेल्या काही दिवसांपासून तिलारी घाटात सुरू झालेले अपघातांचे सत्र काही केल्या कमी होतानाचे दिसत नाही. काल, शुक्रवारी रात्री घाटात आणखी एक अपघात घडला. सुदैवाने अपघातग्रस्त गाडी दरीत न कोसळता रस्त्यावरच पलटी झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातामुळे तिलारी घाटातील वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.तिलारी घाटात गेल्या काही दिवसात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतीतीव्र उतार आणि नागमोडी वळणे शिवाय अरुंद रस्ता यांचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच एक पिकअप व्हॅन व कार दरीत कोसळली होती. या दोन्ही गाड्या काढण्यासाठी जाणारी क्रेनही नियंत्रण सुटून दरीत कोसळून एक जण ठार झाला होता. ही दुर्घटना ताजी असतानाच काल, शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा गोव्याच्या दिशेने संगमरवरी दगडाच्या फरशीची वाहतूक करणारी पीक अप व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यावर पलटी झाली. सुदैवाने रस्ता सोडून दरीच्या दिशेने धावणारी पीक अप लोखंडी संरक्षक खांबांना आदळून रस्त्यावर पलटी झाली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात जिवीतहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले.
Sindhudurg-चालकाचे नियंत्रण सुटून तिलारी घाटात पिकअप व्हॅन उलटली,..अन् मोठा अनर्थ टळला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 01, 2023 6:48 PM