मनोज वारंगओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी रात्रभर पावसाची संततधार होती. मात्र, गुरुवार सकाळपासून अधूनमधून पावसाची मुसळधार सर लागत आहे. त्याशिवाय वादळी वाऱ्यांचा वेग वाढला असून, ठिकठिकाणी पडझडीचे सत्र सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ नागरिकांचा पुराच्या पाण्यात वाहून तर एका तरुणीचा झाड पडून मृत्यू झाला आहे.गेले काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला होता. परिणामी, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. शेतात शिरलेले पाणी आता ओसरू लागले आहे. शेतातील पाणी ओसरल्याने कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. शिवाय समाधानकारक पाऊस पडत असल्याने लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडणे, घरांची छपरे उडून जाण्याचे प्रकार घडत आहेत.
आतापर्यंत झालेले नुकसानसिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १७ पक्क्या व ३ कच्चा घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ५१८ पक्क्या व २१४ कच्चा घरांचे अंशतः नुकसान, २१ गोठे, १ पोल्ट्री आणि ४२ मागरांचे नुकसान झाले आहे. १४ दुधाळ जनावरे, १ ओढकाम करणारे आणि ३१९५ कोंबड्यांचा पुराच्या पाण्याने मृत्यू झाला आहे.
गत चोवीस तासात पडलेला पाऊसजिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ५०.९ च्या सरासरीने ४०७.२ तर आतापर्यंत १५४६.३ च्या सरासरीने १२३७०.४ मी. मी पाऊस पडला आहे. यात देवगड ५३.१ (१४९१), मालवण ३५.२ (१४१०.६), सावंतवाडी ५४.१ (१७९१.५), वेंगुर्ला ३६ (१४९३.६), कणकवली ९३.३ (१४९०.८), कुडाळ ३९.१ (१५२९.५) वैभववाडी ४४.४ (१३९२.८) तर दोडामार्ग ५१.३ (१८०८) मिमी पावसाची नोंद झाली आहे.