दिनेश साटमशिरगांव : शिरगांव चौकेवाडी फाट्यानजीक गव्याच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या बाबल्या गणपत पवार यांची वनविभागाने तत्काळ दखल घेत शुक्रवारी सायंकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.देवगड तालुक्यातील शिरगांव-कुवळे मार्गावरील चौकेवाडी फाट्यानजीक गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास बाबल्या गणपत पवार या दुचाकीस्वाराला गव्याने अचानक हल्ला करून गंभीररीत्या जखमी केले. त्यांना पुढील उपचाराकरिता शुक्रवारी सकाळी शिरगांवहून कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची दखल वनविभागाने तत्काळ घेऊन घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला. या प्रकरणी हल्ल्यातील जखमी बाबल्या पवार यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
गुरुवारी साळशी ओहोळानजीकच्या कातकरी वस्तीवर राहणारे बाबल्या गणपत पवार हे आपल्या दुचाकीने शिरगांवला गेले होते. ते रात्री साळशी येथील आपल्या घरी जात असताना रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात ते गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला शिरगांव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्या शरीराची उजवी बाजू कमकुवत झाल्याने त्यांना नीट बोलताही येत नव्हते. डोक्यालाही मार लागला आहे. शुक्रवारी सकाळी अधिक उपचाराकरिता त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.बाबल्या पवार यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीची खरी गरज आहे. त्यांना शासनामार्फत मदत मिळावी अशी मागणी होत आहे.कणकवलीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, सामाजिक वनीकरणच्या वनपाल आशा शिंदे, देवगड वनपाल सारीक फकीर, वनरक्षक रामदास घुगे, शिरगांव पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, सत्यवान पवार आदींनी शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी वनपाल सारीक फकीर म्हणाले, गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले बाबल्या पवार यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील