शिक्षकांचे काम हे फार जबाबदारीचे काम असून नव्या पिढीला घडवण्याचे काम शिक्षक करतात. गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून आहेत. शिक्षकांनी मोकळेपणाने शिक्षण देण्याचे काम करावे यासाठी शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. सरकारी शाळेवर पालकांचा विश्वास वाढत असून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती केली जाईल, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला.
शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पा-टप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा, अशी अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान आज वेंगुर्ला नवा बाग बीच येथील झुलत्या पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी ‘माझा वेंगुर्ला’ पतंग महोत्सवाचे उद्घाटन आणि वेंगुर्ला नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देखील करण्यात आले.