कणकवली : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिपांची वीज बिले राज्य सरकारकडून भरण्यात यावीत. तसेच घरबांधकाम परवानगीच्या जाचक अटी रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणेच ग्रामपंचायत स्तरावर ते अधिकार द्यावेत, या प्रमुख मागण्या भाजप प्रणित सरपंच संघटनेच्यावतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा प्रणित सरपंच संघटना स्थापन झालेली आहे. त्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेक वर्षापासून सरपंचांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणीही या संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील घरबांधकाम परवानगीची जाचक अट रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणे कलम ५२ नुसार ग्रामपंचायतींना बांधकाम परवानग्या देण्याचे अधिकार प्राप्त व्हावेत. सरपंचांचा एक प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून नेमा. आपले सेवा केंद्रातील अडचणी दुर होण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी यामधील सरपंचांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत उच्च स्तरीय बैठक आयोजित करावी.
ग्रामपंचायत हद्दीतील पथदिपांची वीज बिले सरकारने भरावीत!, भाजपा प्रणित सरपंच संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी
By सुधीर राणे | Published: October 07, 2022 3:41 PM