कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेने गुरुवारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती युवा सेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिली. तसेच उत्तम लोके यांनी धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करत असल्याचे निवेदन प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. आवळे यांना दिले.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री, तालुका समन्वयक गुरूनाथ पेडणेकर, कणकवली उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर आदी उपस्थित होते.युवा सेनेने विविध मागण्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे योग्यसादर केल्या होत्या. त्यामध्ये अपुऱ्या कर्मचारी वृंदामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रुग्णालयात ३० अधिपरिचारिका पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ पदे भरण्यात आली आहेत. बदली झालेल्या जागी अजून दुसरे कर्मचारी हजर झालेले नाहीत. रुग्णालयात कायमस्वरुपी स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे छोटया मोठया शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत. गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागते.आस्थापनाविभागामध्ये वरीष्ठ लिपीक हे पद व इतर पदे रिक्त झाली आहेत त्याठिकाणी ८ पदे मंजूर असून ७ पदे रिक्त आहेत रिक्त पदावर अद्याप कोणताही कर्मचारी रुजू झालेला नाही. त्यामुळे आस्थापना विभागामध्ये गैरसोय निर्माण झाली आहे. रुग्णालयात सी आर्म मशिन, डॉक्टर, अधिपरिचारिका व अन्य कर्मचारी तातडीने उपलब्ध करावेत. दरम्यान, युवा सेनेने केलेल्या मागण्या अद्याप पर्यत मंजूर केलेल्या नाहीत. तसेच त्याबाबतचे जिल्हा रुग्णालयाने दिलेले उत्तर समाधानकारक नाही. त्यामुळे त्या काळात यापुढील काही दिवसात या मागण्या मंजूर न झाल्यास ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिला आहे. दरम्यान, युवासेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील युवासेनेचे उपोषण तूर्तास स्थगित!
By सुधीर राणे | Published: October 26, 2023 3:55 PM