सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर ठाकरे-शिंदे वादात अडकून पडलेल्या जिल्हा नियोजन समिती सभेस तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर मुहूर्त मिळाला आहे. जिल्ह्याचे नवे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे. या सभेमुळे मागील पाच महिने रखडून पडलेली जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. भाजपचा मंत्री पहिल्यांदाच अध्यक्ष म्हणून या सभेस बसणार असल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.राज्यातील आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आघाडी सरकार अल्पमतात येत कोसळले. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार कार्यरत झाले. मात्र, या सरकारने पदभार स्वीकारताच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या नियोजन आराखड्यांना स्थगिती दिली. साहजिकच सर्व जिल्ह्यांच्या विकास कामांना ब्रेक लागला होता.आता मंत्रिमंडळ विस्तार होऊन प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहेत. यामुळे या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठक यापूर्वी २० मे २०२२ रोजी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेत सन २०२१-२२ च्या मंजूर १०० कोटी रुपयांच्या आराखड्यातील खर्चाचा आढावा घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे कामांनाही मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर राज्यात घडलेल्या सत्तानाट्यामुळे या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा विकासाची सर्व कामे रखडून पडली होती. परंतु, आता जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाल्यामुळे जिल्हा नियोजन समिती सभांना सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीला यामुळे मुहूर्त मिळाला असून तब्बल ५ महिन्यांनी ही सभा नवे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे.
सत्ताधारी-विरोधक संघर्ष दिसणार!राज्यातील सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या सभेकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागले असून या सभेमध्ये सत्ताधारी भाजपा, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आता जिल्हा नियोजन समितीमध्ये जुने सदस्य असणार नाहीत. नवीन सदस्यांची नेमणूक अद्याप झालेली नाही. त्यामुळे आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत हेच प्रमुख विरोधक असणार आहेत.