सिंधुदुर्ग : कुडाळपोलिसांनी उघड केलेला बनावट भारतीय चलनी नोटा छपाईचा गुन्हा हा तीन आरोपींनी संगनमताने केला असून, त्यांनी छपाई केलेल्या १ लाख ३४ हजार ७०० रुपयांच्या नोटा चलनात आले नसल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत सांगितले. हा गुन्हा करण्यामागे कमी वेळात जास्त पैसे कमावणे हा उद्देश होता, असेही त्यांनी सांगितले.पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम म्हणाले की, तपासादरम्यान यातील आरोपीने कुडाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेत कॅश डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट केलेल्या बनावट नोटा या आरोपी निशिगंधा कुडाळकर हिच्या खात्यावर डिपॉझिट केलेल्या असल्याचे समजल्याने त्यावेळी निशिगंधा कुडाळकर हिला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता तिने आरोपी सूर्या ठाकूर हा आपले पैसे देणे असल्याने त्याने विनाकारण आपल्या बँक खात्यामध्ये खोट्या नोटा डिपॉझिट केलेल्या असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर गुन्ह्यातील आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यामार्फत शोध घेतला असता गुन्ह्यातील मूळ आरोपी सुरेंद्र ऊर्फ सूर्या रामचंद्र ठाकूर (४० वर्षे, रा. पलूस, घर नं. ०९, सोनाई हॉस्पिटल, ता. पलूस, जि. सांगली) याचे लोकेशन हे वारंवार मुंबई, पुणे, गोवा, सांगली असे फिरते असल्याने आरोपी हा मिळून येत नव्हता. त्या मुदतीत आरोपीचे लोकेशन हे पलुस सांगली येथे मिळत असल्याने व त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने या आरोपीस ९ ऑगस्ट रोजी पलूस, जिल्हा सांगली येथून ताब्यात घेतले.ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक हृषीकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर, उपनिरीक्षक रवींद्र भांड, पोलिस अंमलदार स्वप्निल तांबे, गणेश चव्हाण, प्रीतम कदम, कृष्णा केसरकर, रूपेश सारंग, संजय कदम यांनी केली.
दोन कलर प्रिंटर जप्तगुन्ह्याच्या तपासात कुडाळ शहरातील आरोपी विजय रविकांत शिंदे (२५ वर्ष, रा. मुळदे, फौजदारवाडी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) व आरोपी निशिगंधा उमेश कुडाळकर (२५ वर्षे, रा. पिंगुळी राऊळ महाराज मठ जवळ, ता. कुडाळ, मूळ रा. वालावल समतानगर, ता. कुडाळ) यांचादेखील गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात अटक करून आरोपी यांच्या ताब्यातून बनावट चलनी नोटा छपाईसाठी वापरलेले दोन कलर प्रिंटर जप्त करण्यात आले आहेत.
१ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्तआरोपींकडून एकूण १,३४,७०० रुपये किमतीच्या १००, २०० व ५०० रुपयांच्या भारतीय बनावट चलनी नोटा तसेच एकूण ३ कलर प्रिंटर व त्याचे साहित्य मिळून एकूण १ लाख ७१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेल्या बनावट चलनी नोटांसंदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात वरील आरोपींचा सहभाग आहे किंवा कसे याबाबत तपास चालू आहे.