सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांच्या भरतीत स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना प्राधान्य द्यावे. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले जिल्हा परिषद कार्यालयासमोरील साखळी धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय फाले यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. यामुळे येथील शाळांवर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार सन २०१० पासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत कौटुंबिक गरिबी असूनही या उमेदवारांनी डीएड पदविका धारण केली आहे. मात्र शासनाकडून गेली दहा ते बारा वर्षे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. तसेच राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया राज्यस्तरीय राबवण्यात येत असल्याने येथील स्थानिक उमेदवारांना संधी मिळत नाही.या भरतीमध्ये जिल्ह्याबाहेरील उमेदवारांचीच भरती होत असल्याने हे उमेदवार तीन वर्षानंतर आपल्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने जातात.त्यामुळे येथील पदे कायमच रिक्त राहतात. याचा परिणाम जिल्ह्याच्या शैक्षणिक दर्जावर व मुलांच्या प्रगतीवर होत आहे. याचा विचार करून शासनाने जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदांवर स्थानिक डीएड बेरोजगार यांना संधी द्यावी. या मागणीसाठी जिल्ह्यातील डीएड बेरोजगार उमेदवारांनी २० जून पासून जिल्हा परिषद समोर साखळी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे आजचे आंदोलन तुर्तास स्थगित करून, हे आंदोलन २८ जून पासून करणार असल्याची माहिती डी एड बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय फाले यांनी दिली.
Sindhudurg: डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे आंदोलन तूर्तास स्थगित
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 20, 2023 4:59 PM