कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात व्यवस्था परिवर्तनाचे पर्व सुरू आहे. व्यवस्था परिवर्तन ही केवळ एका रात्रीत घडणारी गोष्ट नसून त्यासाठी मोठे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मोठी हिम्मत लागते. या सगळ्या बाबी नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वात आहेत. व्यवस्थेतील हे सकारात्मक बदल जाणीवपूर्वक जनतेपर्यंत जायला हवेत असे प्रतिपादन भाजप प्रदेशचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी यावेळी केले.भाजपच्या 'सेवा पंधरवडा' या अभियानांतर्गत कणकवली येथील बुद्धिजीवी व्यक्तींच्या संमेलनात 'व्यवस्था परिवर्तनाची २० वर्षे' या विषयावर ते बोलत होते. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, सी.ए., प्राध्यापक, शिक्षक असा प्रज्ञावंत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.माधव भांडारी म्हणाले, काही वर्षांपूर्वी कागदपत्र 'ट्रू कॉपी' म्हणजे अटेस्टेड करण्याची 'व्यवस्था' होती. काही ठिकाणी यासाठी किंमतही मोजावी लागत होती. त्याचा त्रास सहन केलेली आपली पिढी आहे. आता ही व्यवस्था बदलून 'सेल्फ अटेस्टशन' पद्धत आली. हा खूप मोठा दिलासादायक बदल आहे. पण याची कधी चर्चा झाली नाही. त्यामुळे या नवीन व्यवस्थेचे महत्व लोकांच्या लक्षात आले नाही. काही वर्षांपूर्वी इतर विकसित देशांकडून अवहेलना सहन करणारा आपला भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत.नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदाची १२ वर्षे आणि पंतप्रधान पदाची ८ वर्षे अशा २० वर्षाच्या वाटचालीचा आढावा 'मोदी@२०' या पुस्तकात आहे. अनेक मान्यवरांनी त्यात मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवर लिहिलेले आहे. देशातल्या डिजिटल क्रांतीने तर अनेक देशांना मागे टाकलेले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सेवा पंधरवडा या विषयावर मनोगत व्यक्त केले. संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसन्ना देसाई यांनी आभार मानले. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,शरद चव्हाण, उपस्थित होते.
व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज - माधव भांडारी
By सुधीर राणे | Published: September 26, 2022 2:01 PM