कणकवली : कुंभार समाजबांधवांना जातीचा दाखल काढताना व मातीचा व्यवसाय करताना जिल्हा प्रशासनाकडून यापुढे कोणताही त्रास होणार नाही. याची काळजी घ्यावी , असा आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.कुंभार समाजबांधवांना जातीचा दाखल काढताना व मातीचा व्यवसाय करताना जिल्हा प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या दालनात विविध खात्याचे मंत्री व कुंभार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमेवत बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून समाजबांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकाम बोर्डाचे कामकाज त्वरित सुरु करावे, असे आदेशही खादी व ग्रामोद्योग अधिकाऱ्यांना देण्यात आले.बैठकीला महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत शेंदुलकर, कार्याध्यक्ष विलास गुडेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर, सुहास पिंगुळकर आदी उपस्थित होते. कुंभार समाजातील व्यक्तीस कोणतीही फी व स्वामित्वधन न आकारता मातीची ५०० ब्रास मर्यादा ही अट काढून कोणतीही मर्यादा ठेवू नये. शेतात वाहून आलेली माती व गाळ हा कुंभार समाजातील पारंपरिक विट व्यावसायिकांना शासकीय नियमानुसार मिळावा. पिढीजात कुंभार समाजातील व्यक्तीला लागणारी तात्पुरती बिगर शेती परवान्याची अट काढून टाकण्यात यावी. या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले. दरम्यान, महाराष्ट्र कुंभार समाजाचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी सिंधुदुर्ग कुंभार समाज मेळाव्यात सांगितल्याप्रमाणे ही मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
कुंभार बांधवांना त्रास होता कामा नये!, मंत्री विजय वडेट्टीवारांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 12:10 PM