अनंत जाधव
वेंगुर्ले :लोकशाहीत लोकांची भूमिका महत्वाची असते.त्यामुळे जेथे लोकांचा विरोध नसेल तेथे रिफायनरी प्रकल्प व्हावा ही आमची पहिल्यापासून भुमिका आहे.त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची भुमिका रिफायनरी बाबत सौम्य झाली असा अर्थ कोणी घेऊ नये यात प्रकल्पातून रोजगार येणार असतो त्यामुळे तेथे कोणीही राजकारण करत नाही असा टोला राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांना लगावला.तसेच रिफायनरी विदर्भात घेऊन जावू या मंत्री नितिन गडकरी यांच्या वक्तव्यावर हा टेक्निकल मुद्दा असल्याचे म्हणत यावर भाष्य करणे टाळल्याचे दिसून आले.
मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी वेगुर्ले येथे लोकमत शी संवाद साधत रिफायनरी प्रकल्प तसेच केंद्रिय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली. लोकशाहीत आम्ही लोकांच्या भूमिकेला अधिक महत्त्व देतो त्यांनी नाणार येथील जागेला विरोध केल्याने आम्ही स्थानिकांच्या पाठीशी राहिलो पण हा प्रकल्प महाराष्ट्रातच व्हावा ही महाविकास आघाडीची भूमिका असून,उद्योग विभाग त्या प्रमाणे जागेचा ही शोध घेत आहे.लवकरच चांगली बातमी तुम्हाला समजेल असे म्हणत रिफायनरी प्रकल्प नाणार येथून जाणार असे संकेत ही त्यानी यावेळी दिले आहेत.मात्र प्रकल्प कुठे होणार हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
मध्यंतरी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी प्रकल्पाला कोकणात विरोध असेल तर विदर्भात घेऊन जाऊ या त्यांच्या भूमिकेवर ही मंत्री ठाकरे यांनी भाष्य केले हा टेक्निकल मुद्दा आहे शेवट पाण्याचा प्रश्न येतोच असे सागितले तर पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी रिफायनरी बाबत महाविकास आघाडीची भुमिका सौम्य झाल्याचे म्हटले होते.पण मंत्री ठाकरे यांनी प्रकल्पात राजकारण करायचे नसते.लोकशाहीत लोकांच्या भूमिकेला महत्त्व असते.महाविकास आघाडी सरकारचा प्रकल्पाला विरोध नाही.असे सांगत जागेचा शोध सुरू असून लवकरच त्यावर मार्ग काढू असे ही यावेळी स्पष्ट केले.