सावंतवाडी : प्रशासकीय राजवटीत सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने घरपट्टीसह पाणीपट्टीत वाढ केली आहे. करवाढीच्या या निर्णयाविरोधात नागरिकांबरोबरच सर्व पक्षीय चांगलेच आक्रमक झाले आहेत. नगरपालिका प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी सर्वपक्षीयाकडून करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपालिकेने सन २०२३-२४ च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात घरपट्टीसह पाणीपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. ही नवीन दर वाढ एक एप्रिल पासून लागू होणार आहे. यात घरपट्टीमध्ये किमान २५ रुपये ते ३९९ पर्यंत सरसकट वाढ करण्यात आली आहे. तर पाणीपट्टीत ही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषदचा अर्थ संकल्प जाहीर करण्यात आला असून प्रशासकीय राजवट असताना नगरपरिषद प्रशासनाकडून दुसऱ्यादा हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध करात भरमसाठ वाढ केल्याने याचा सर्वस्वी बोजा नागरिकांवर पडणार आहे. मोठ्या प्रमाणात कर वाढ करत असताना पालिका प्रशासनाने याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन प्रत्येकाची मते जाणून घेणे बंधनकारक होती. पण तसे न करता अचानक ही करवाढ केल्याने याचा फटका शहरातील नागरिकांना बसला आहे. सावंतवाडीत आतापर्यंत झालेली ही सर्वोच्च करवाढ मानली जात आहे.
करवाढ मागे घ्या, बबन साळगावकरासह माजी नगरसेवक आक्रमकसावंतवाडी नगरपरिषदने अचानक केलेल्या करवाढीवरून शहरातील लोकप्रतिनिधींसह नागरिकात प्रचंड उद्रेक असून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तर प्रशासनाचा निषेध करत करवाढ मागे न घेतल्यास नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. तसेच ही करवाढ अन्यायकारक असल्याचे सांगितले. एकदम 400 रुपये करवाढ करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. नगरपालिकेचे उत्पन्न कमी झाले असेल म्हणून एकदम एवढी करवाढ कशी काय होऊ शकते असा सवाल साळगावकर यांनी केला.
भाजप जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार : तेली नागरीकांना कोणतीही कल्पना न देता तसेच राजकीय पदाधिकार्यांना विश्वासात न घेता सावंतवाडी पालिका प्रशासनाने वाढवलेली घरपट्टी व पाणी पट्टी अन्याय करणारी आहे. त्यामुळे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आपण जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले. नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांना घरपट्टी पाणीपट्टी वाढविण्याची इतकी घाई का ? याबाबतचा फेरविचार मुख्याधिकार्यांनी करावा, जर यावर काही मार्ग निघाला नाही तर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.