सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव आज, शनिवारी होत आहे. भराडीमातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. चिपी विमानतळावरुन मुख्यमंत्री आगणेवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः त्यांच्या गाडीचे सारथी बनले. राज्यातील सत्तातंरानंतर मुख्यमंत्री शिंदे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारा वाजून पंधरा मिनिटांनी नियोजित वेळेत चिपी विमानतळावर दाखल झाले. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, अनारोजीन लोबो, निता कविटकर, सचिन वालावलकर आदींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते थेट मालवणच्या दिशेने रवाना झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे हे देखील आहेत.वस्त्रालंकारानी सजलेले देवीचे रुप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने आंगणेवाडीत भाविकांचा महापूर उसळणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यानी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत बनले मुख्यमंत्र्यांचे 'सारथी'; भराडी देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात
By अनंत खं.जाधव | Published: February 04, 2023 12:51 PM