अनंत जाधवसावंतवाडी : माजगाव येथे झालेल्या बनावट बदली पास प्रकरणाच्या पंचनाम्याची गहाळ झालेली कागदपत्रे अखेर मंगळवारी मिळाल्याने वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला. ही कागदपत्रे मिळाल्याने तीन कर्मचाऱ्याचे निलंबन टळले.
गहाळ झालेली ही कागदपत्र मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार हे वनविभागाच्या कार्यालया समोर उपोषण बसले होते. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कागदपत्र गहाळ प्रकरणी दोषी ठरवून तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही तयार केला होता. मात्र आता कागदपत्रे मिळाल्याने या कर्मचाऱ्याचे निलंबन टळले.माजगाव येथील वृक्षतोड प्रकरणी तत्कालीन वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, वनपाल चंद्रसेन धुरी यांच्यासह वनरक्षक यांनी खोटा पंचनामा केल्याचे माहितीच्या अधिकारात जयंत बरेगार यांनी उघड केले होते. बरेगार यांनी ही कागदपत्रे मिळावीत म्हणून सतत पाठपुरावा केला. पण ही कागदपत्रे त्यांना मिळाली नाहीत. अखेर त्यांनी आठवड्यापूर्वी वनविभाग कार्यालया समोर उपोषण केले.उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत चौकशी करण्यात येईल असे सांगितले. तसेच चौकशीचे काय होते याची माहिती ही बरेगार यांना प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक सर्जेराव सोनवडेकर हे देतील असे सांगितले होते. त्यानंतर बरेगार यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. बरेगार याच्या उपोषणानंतर उपवनसंरक्षक नारनवर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खात्यांतर्गत चौकशीही सुरू केली होती. तसेच या प्रकरणात वनपालासह दोन कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबनाची कारवाई करण्यात येणार होती.दुसरीकडे सावंतवाडी वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ही गहाळ झालेली कागदपत्र शोधण्यासाठी रात्रीचा दिवस एक केला होता. अखेर कर्मचाऱ्यांनी ही कागदपत्रे मंगळवारी शोधून काढली. कार्यालयातच ही कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे आता तीन कर्मचाऱ्यांवरची निलंबनाची कारवाई ही टळली. ही कागदपत्रे लवकरच बरेगार यांना देण्यात येणार आहेत.