कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील वागदे येथील एका हॉटेल समोर लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला. अपघातात जवळपास २५ पेक्षा अधिकजण जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज, मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास झाला. देवगड, पाडगावच्या दिशेने हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना पिकअप चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे पिकअप गाडी रस्ता दुभाजकावर गेली. तसेच महामार्गावर पिकअप टेम्पो पलटी झाला. यात अनेकांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्गावरून जाणाऱ्या वागदे सरपंच संदीप सावंत, राजा पाटकर यांच्यासह अन्य नागरिकांनी जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. खासदार विनायक राऊत, नीलम सावंत, सुशांत नाईक, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष रंजन राणे यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या अपघातात अनेकांना गंभीर इजा झाली असून त्याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
Sindhudurg News: वागदे येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणारा टेम्पो उलटला, अनेक जण गंभीर जखमी
By सुधीर राणे | Published: May 02, 2023 5:01 PM