कणकवली: युद्ध जिंकायची असतील तर फक्त तलवारीने जिंकता येत नाहीत. तर त्यासाठी मनगटात ताकद हवी, मनही खंबीर हवे. आगामी निवडणूक आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. भाजपला सत्तेतून दूर करून आपणाला पुन्हा एकदा भगव्याची प्रतिष्ठापणा विधानसभेतच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावरही करावी लागेल असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या जनसंवाद यात्रे निमित्तच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश कोरगावकर, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभा मतदारसंघप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, भाजपवाले आता नारा देत आहेत, 'अब की बार चारसो पार' , मग त्यांच्यात हिंमत असेल तर स्वतःच्या हिमतीवर त्यांनी तेवढे खासदार निवडून आणावे. चारसो पारची खात्री असेल तर का फोडाफोडी करता? तिकडे नितीशकुमारना फोडले, सोरेनना अटक करता, ईडी, सीबीआय पाठी लावता, म्हणूनच यावेळी आता एकच नारा द्यायचा, अब की बार, भाजप तडीपार'. कोकणच्या या दौऱ्यात भगवे वादळ दिसत असून ते दिल्लीच्या दिशेने पुढे सरकत आहे, तुमची साथ अशीच असेल तर भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन मी उचलल्याशिवा राहणार नाही.
दिल्लीच्या तख्तावरही भगव्याची प्रतिष्ठापना करू - उद्धव ठाकरे
By सुधीर राणे | Published: February 05, 2024 5:46 PM