सिद्धेश आचरेकरआचरा : मालवण तालुक्यातील आचरा गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा हुकूम अंतिम मानत आचरेवासीयानी रविवारी दुपारनंतर शेकडो वर्षांची परंपरा जोपासताना गावपळणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव खाली केले. गावकऱ्यांनी आचरा गावच्या चारही बाजूंच्या सीमेलगत संसार थाटले. तब्बल पाच वर्षांनी गावपळणीचा कौल श्री देव रामेश्वराने दिल्याने ग्रामस्थ गावपळणीच्या प्रथेचा मनमुराद आनंद लुटू लागले आहेत. जणू अख्खं गाव तीन दिवस तीन रात्री करीता रामेश्वराच्या स्वाधीन केले आहे.
गौरवशाली परंपरा असलेल्या ऐतिहासिक गावपळण प्रथेचा रविवारी प्रारंभ झाला. ग्रामस्थांनी आपापली घरे बंद करून पाळीव प्राणी, गुरेढोरे, मांजर, कोंबडी, पोपट, कुत्रे आणि कुटुंबासह सीमेबाहेर संसार थाटले. बघता बघता सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेला आचरे गाव पुर्णतः निर्मनुष्य झाला. मुणगे करिवणे नदीकिनारी, चिंदर माळरान येथे उभारलेल्या झोपड्यामध्ये ग्रामस्थ आणि आबालवृद्ध मंडळी विसावली आहेत. १८ रोजी गाव नाही भरला तर अंगारकी संकष्टी झोपड्यामध्ये साजरी केली जाणार आहे. आचरा पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरासह पाच स्थळांना गाऱ्हाणे केले. रामेश्वराच्या नगारखान्यातील नौबत दणाणल्यानंतर तोफांचा आवाज अन् बंदुकीच्या फैरी होताच दोन्ही दिंडी दरवाजे बंद करण्यात आले. रामेश्वराचे मुख्य प्रवेशद्वार बारापाच मानकऱ्यांनी बंद केले. मंदिरातील धार्मिक विधी आटोपल्यानंतर सारे गाव तासाभरात निर्मनुष्य झाले. तीन दिवस तीन रात्री कडाक्याची थंडीतही शेकोटीची ऊब घेत गाण्यांच्या भेंड्या बरोबर गप्पांचे फड तसेच अनेकविध मनोरंजनाचे कार्यक्रम रंगणार आहेत. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या आचरे गाव निसर्गाच्या सानिध्यात सर्व जातीधर्माच्या लोकांसमवेत झोपड्यामध्ये नांदत आहेत.
विज्ञानाचा श्रद्धेची सांगड !गावपळणीमुळे ग्रामस्थांमध्ये एक नवा उत्साह, नवी शक्ती संचारते. संपूर्ण गाव तीन दिवस मोकळा राहिल्याने गावात होणारे प्रदूषण, विविध प्रकारचे उद्धभवणारे रोगराई आटोक्यात येते. नैसर्गिक दृष्ट्या गाव पुर्णतः शुद्ध होतो. तीन दिवसांनी नवा जोश घेवून प्रत्येक ग्रामस्थ आपल्या हक्काच्या घरट्यात परततो. अशीही विज्ञानाला श्रद्धेची सांगड घालून ग्रामस्थ शेकडो वर्षांची प्रथा मोठ्या उत्साहात जोपसत आहेत.
अशी आहे अख्यायिका!पूर्वीच्या काळी आचरे गाव सुखाने नांदत नव्हता, सुखवस्ती होत नव्हती. त्यावेळी मानकऱ्यांनी श्री देव रामेश्वराकडे कौल मागितला आता गावात असणाऱ्या अदृश्य, पाशवी शक्तींना तीन दिवस तीन रात्री गाव मोकळा सोडल्यास गाव सुखवस्तू होईल, असे वचन दिले. त्याप्रमाणे देवाने दिलेल्या वचनाचा आदर करत शेकडो वर्षांचा उभा असलेला संसार, जमीनजुमला सोडून ग्रामस्थ सीमेपलीकडे निसर्गाच्या सानिध्यात गुण्या गोविंदाने राहतात.