प्रकाश काळेवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : वैभववाडी तालुक्यातील शिराळेच्या वार्षिक ‘गावपळण’ला शुक्रवारी प्रारंभ झाला. गुराढोरांसह पाळीव प्राणी, पक्ष्यांना सोबत घेऊन गावकरी वेशीबाहेर आले आहेत. पुढचे चार-पाच दिवस गावकऱ्यांचा मुक्काम सडुरेच्या हद्दीत गावपत्थर येथील राहुट्यांमध्ये असणार आहे.संपूर्ण गाव तेथे एकत्र आल्यामुळे एरव्ही सुनसान असणाऱ्या ठिकाणी गलबलाट सुरू झाला आहे. कडाक्याची थंडी असूनही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर या वार्षिकाचा उत्साह दिसत आहे. साडेचारशे वर्षांपूर्वी सुरू केलेली प्रथा आजही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पार पडली जात आहे.
शुक्रवारी दुपारीच शिराळेवासीयांनी गावकुसाबाहेर उभारलेल्या राहुट्यांच्या दिशेने पाळीव प्राणी- पक्ष्यांसह पाच-सहा दिवसांचे दाणागोट्याचे गाठोडे घेऊन प्रस्थान केले. वयोवृद्ध, लहान मुले आणि महिला वर्ग साहित्य घेऊन एसटी व खासगी वाहनांनी राहुट्यांकडे पोहोचले. सायंकाळी अंधार पडेपर्यंत गावकरी राहुट्यांकडे येतच होते.संपूर्ण गाव एकत्र आल्यामुळे राहुट्यांनजीक एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस गावकरी येथेच वास्तव्य करणार आहेत. गावकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेल्या गुराढोरांसह गावची ‘वेस’ न ओलांडता येथेच वास्तव्य करणार आहेत. शाळा, अंगणवाडी येथेच भरणार आहे.अशा आहेत गावपळणच्या आख्यायिका..साडेचारशे वर्षांपूर्वी घोरीप खेळ करण्यासाठी आलेल्या कुटुंबाचा गावकऱ्यांनी गैरसमजातून वध केला. त्या कुटुंबाने गावकऱ्यांना दिलेल्या शापामुळे गावाचे मोठे नुकसान होऊ लागले. त्यानंतर गावकऱ्यांनी देवाकडे विचारणा केली असता देवाने गावकऱ्यांना काही दिवस गावाबाहेर राहण्यास सांगितले. तिथून गावपळण सुरू असल्याचे सांगितले जाते. तर गावपळणीबद्दल काहींचे मत वेगळे आहे. शिराळे गावात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी अनेकांचे बळी गेले होते. त्यामुळे त्यातून बचावासाठी लोकांनी स्थलांतर केले गेले. त्यातूनच ही प्रथा पुढे रूढ झाल्याचेही ऐकायला मिळते.