सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार तज्ञ तथा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष पी.एफ डॉन्टस (73) यांचे कोलगाव येथील राहत्या घरी रविवारी पहाटे च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.डॉन्टस याच्या निधनाच्या वृत्ताने सहकार क्षेत्रासह माजी सैनिक संघटनेचा आवाज हलपला आहे.
माजी सैनिक असलेले पी.एफ. डॉन्टस यांचे सहकार तसेच माजी सैनिक क्षेत्रात मोठे काम होते.त्यांनी माजी खासदार सुधीर सावंत यांच्या खांद्याला खांदा लावून माजी सैनिकांच्या विविध समस्या शासन दरबारी माडून त्याना न्याय मिळवून दिला होता.
त्यातूनच माजी सैनिक संघटना स्थापन केली तसेच सैनिक पतसंस्थेची स्थापना करण्यात त्याचा मोठा वाटा आहे.यातून अनेक माजी सैनिकांना वेगवेगळी मदत मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले होते.
आंबोली येथील सैनिक स्कूल यातून तर अनेक सैनिकी मुले घडवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला आज ही सैनिक शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहे.त्याच्या पुढाकारातून कॅथॉलिक बँकेची ही स्थापना करण्यात आली या बँकेने ही सहकार क्षेत्रात मोठी प्रगती केली डॉन्टस हे सैन्यदलात होते तेथून निवृत्त झाल्यानंतर त्यानी सहकार खात्यात काम केले होते.त्याचवेळी त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन केली आणि आपल्या नेतृत्वाची चुणूक दिली होती.त्यानंतर राज्य सरकारी पतसंस्थेच्या स्थापनेत त्याचा मोलाचा वाटा होता.याच काळात ते माजी खासदार सुधीर सावंत यांच्याशी जोडले गेले.आणि सावंत यांचे विश्वासू सहकारी बनले.
सुधीर सावंत हे सैन्यदलात मोठ्या पदावर कार्यरत होते त्यानंतर खासदार म्हणून ही त्यांनी आपला ठसा उमटवला होता.त्याच्या साथीने डॉन्टस यांनी सहकार शिक्षण व पर्यटन क्षेत्रात मोठे काम केलेच तसेच माजी सैनिकांना ही न्याय मिळवून देण्याचे काम डॉन्टस यांनी केले होते.यातून त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला.डॉन्टस यांच्याकडे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून पाहिले जात होते.एखादी अडचणीत आलेली संस्था बाहेर काढण्यासाठी त्याचा सल्ला ही मोलाचा मानला जात असे.त्यानी अनेक संस्थाना अडचणीतून बाहेर काढले होते.सहकार क्षेत्रातील आशेचे किरण म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जात होते.
मात्र अलिकडच्या काळात ते आजारी असल्याने घरीच होते. त्यातच त्याचे रविवारी पहाटेच्या सुमारास कोलगाव येथील राहत्या घरी निधन झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून नातवंडे, बहीणी, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.