गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गत दोन वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा झाला असल्याचे पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीसाठा अहवालात स्पष्ट झाले आहे. चालू वर्षी आजच्या दिवसापर्यंत धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गतवर्षी याच दिवसापर्यंत पाणीसाठा ४४ टक्यांवर होता. तर २०२१ मध्ये तब्बल ६७ टक्के धरणातील पाणीसाठा होता. एवढा निचांकी पाऊस गेल्या १० वर्षांत झाला नसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. चालू वर्षात पाऊस उरलेला बॅक लॉग भरून काढेल का हे येणारा काळ सांगून जाईल.जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूप कमी आहे. समाधानकारक पाऊस झाला तर जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व धरण परिपूर्ण भरतील. जुलै महिन्यात पावसाळी हंगामातील सुमारे ७० टक्के पाऊस पडतो. या महिन्यात शेतीचीसुद्धा कामे पूर्ण होतात. जिल्ह्यात ४१ धरण प्रकल्प आहेत. यामध्ये काही ठरावीक धरणातील पाणी हे पिण्यासाठी वापरले जाते. तर काही धरणातील पाणी हे पर्यटन व्यवसाय, शेतीसाठी वापरले जाते.गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्के पाणीसाठा कमी२०२२ मध्ये याच दिवशी ३५४ दलघमी एवढा पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी ४४ टक्के होती. २०२१ मध्ये याच दिवशी धरणात ५३८ दलघमी म्हणजेच ६७ टक्के पाणीसाठा होता. चालू वर्षी २५५ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३२ टक्के आहे.अद्यापही २ धरणे कोरडीच..!जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा झाला असताना कणकवली येथील जानवली व वैभववाडी येथील नाधवडे या प्रकल्पांमध्ये किंचितही पाणीसाठा नसल्याचे अहवालात म्हटले आहे.कोणत्या धरणात किती पाणीसाठाजुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा धरणाचा पाणीसाठा पाहिला तर, दोडामार्ग येथील तिलारी आंतरराज्य प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ४४८ द.ल.घ.मी एवढा आहे, सध्या २५ टक्के पाणीसाठा झाला आहे. देवधरमध्ये २१ टक्के पाणीसाठा आहे अरुणामध्ये ९८ टक्के कोर्ले-सातंडी ८० टक्के शिवडाव २७ टक्के नाधवडे ० टक्के ओटव ३० टक्के देंदोडवाडी ३६ टक्के तरंदळे ३ टक्के आडेली १६ टक्के आंबोली ६९ टक्के चोरगेवाडी २२ टक्के हातेरी ३७ टक्के माडखोल १०० टक्के निळेली ३४ टक्के ओरोस बुद्रुक ७ टक्के सनमटेंब ७० टक्के तळेवाडी दिगस १५ टक्के दाबाचीवाडी २० टक्के पावशी ३१ टक्के शिरवळ ८ टक्के पुळास ४३ टक्के वाफोली १३ टक्के कारिवडे १७ टक्के धामापूर ३० टक्के हरकुळ १०० टक्के ओसरगाव १२ टक्के ओझरम २७ टक्के पाेईप ३१ टक्के शिरगाव ७ टक्के तिथवली १४ टक्के लोरे ३९ टक्के विलवडे ५७ टक्के वर्दे ४ टक्के कोकिसरे २ टक्के शिरवल ४ टक्के नानिवडे २ टक्के सावडाव १ टक्के, जानवली ० टक्के नानिवडे २ टक्के एवढा पाणीसाठा आहे.
Sindhudurg: धरणांतील पाणीसाठा पोहोचला 32 टक्क्यांवर, दोन दिवस पावसाची संततधार सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 1:07 PM