वैभववाडी : येथील दत्त विद्यामंदिर तथा तालुका स्कूलमधील २० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. शाळेच्या चार वर्गखोल्यांचे कुलूप तोडून हा प्रकार रविवार २९ रोजी घडला आहे. दरम्यान, या चोरीचा तपास २६ आॅक्टोबरपर्यंत करावा. अन्यथा धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.बाजारपेठेच्या पूर्वेस दत्तविद्यामंदिर शाळा आहे. ही शाळा तालुका स्कूल म्हणून ओळखली जाते. शनिवारी शैक्षणिक कामकाज संपल्यानंतर शाळा बंद केली. त्यानंतर सोमवारी सकाळी शिक्षक शाळेत गेले असता त्यांना शाळेचे कार्यालय, केंद्र प्रमुख कार्यालय, सभागृह, अपंग मुलांचे संसाधन कक्ष अशा ४ खोल्यांचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.या चारही खोल्यांमधील साहित्य विस्कटून टाकण्याचे दिसून आले. शिक्षकांनी खात्री केली असता पंच मशीन, खडू बॉक्स, पदके, वह्या, पेन, पेन्सिल, स्केच पेन बॉक्स, चषक, टीव्ही रिमोट, इलेक्ट्रीक बोर्ड, रांगोळी असे ४०५५ रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. तर संसाधन कक्षातील भांडी, खेळाचे साहित्य, वह्या असे १६५१७ रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले आहे.दरम्यान, यापूर्वीही मे महिन्याच्या अखेरीस शाळेत चोरी झाली होती. त्यामुळे शाळेत झालेल्या या चोऱ्यांचा छडा लावावा. २६ आॅक्टोबरपूर्वी या चोरीचा छडा न लागल्यास धरणे आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना दिले आहे. हे निवेदन मुख्याध्यापिका दीप्ती पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश शिंदे, उपाध्यक्ष क्रांतीसिंह पाटील, नगरसेवक संतोष माईणकर, शिवाजी राणे, अंजली बाणे यांनी पोलिसांना दिले आहे.
तालुका स्कूलमध्ये २० हजारांच्या साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 10:56 AM
वैभववाडी येथील दत्त विद्यामंदिर तथा तालुका स्कूलमधील २० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. शाळेच्या चार वर्गखोल्यांचे कुलूप तोडून हा प्रकार रविवार २९ रोजी घडला आहे. दरम्यान, या चोरीचा तपास २६ आॅक्टोबरपर्यंत करावा. अन्यथा धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.
ठळक मुद्देतालुका स्कूलमध्ये २० हजारांच्या साहित्याची चोरीव्यवस्थापन समितीचे पोलिसांना निवेदन